सायबर गुन्ह्यांचे आव्हान कायम; दाखल गुन्हे ३२३, उकल झाली केवळ २१ गुन्ह्यांची

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:47 PM2023-03-23T12:47:22+5:302023-03-23T12:48:10+5:30

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांसंबंधित ४ हजार ७१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३४६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

Challenge of cybercrime remains; 323 cases filed, only 21 cases solved | सायबर गुन्ह्यांचे आव्हान कायम; दाखल गुन्हे ३२३, उकल झाली केवळ २१ गुन्ह्यांची

सायबर गुन्ह्यांचे आव्हान कायम; दाखल गुन्हे ३२३, उकल झाली केवळ २१ गुन्ह्यांची

googlenewsNext

मुंबई : सायबर गुन्ह्यांचे वाढते जाळे रोखण्याचे आव्हान यंत्रणांसमोर कायम असल्याचे दाखल गुन्ह्यांच्या उकलीवरून समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यांत सायबर गुन्हे संबंधित ३२३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी अवघ्या २१ गुन्ह्यांची उकल करत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. 
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांसंबंधित ४  हजार ७१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३४६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यात सायबर फसवणुकी संदर्भात २१७० गुन्ह्यांचा समावेश असून त्यापैकी अवघ्या ९३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यापाठोपाठ यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ३२३ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये, क्रेडिट कार्ड आणि फसवणुकीचे १०० आणि नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे सर्वाधिक १६ गुन्हे नोंदविले आहेत. दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत उकल करण्याचे प्रमाण कमी आहे. 

‘बी’चा ‘डी’झाला अन्
ओशिवरा परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकाराने गेल्यावर्षी २०  ऑगस्ट रोजी सोहम रॉक स्टार एंटरटेनमेंट वर्सोवा कंपनीसोबत गाण्यांचे साडेएकवीस लाख रुपये देण्याचा करार केला. 
कराराचे पैसे देण्याबाबत गीतकाराच्या  कंपनीकडून ईमेलद्वारे इन्व्हाईस पाठविले होते. ठगाने याच ईमेलमध्ये ‘बी’ चा ‘डी’ करून संबंधित कंपनीला पाठवून दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. 
संबंधित कंपनीने विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले. मात्र, पैसे न मिळाल्याने गीतकाराच्या अकाउंटंटच्या तक्रारीवरून ओशिवरा पथकाने खात्याचा तपशील मिळवून तपास सुरू केला. 
पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्यात ११ लाखांची रक्कम असल्याचे समजताच ते खाते गोठवत रक्कम दिली. 

गोल्डन अवरमुळे वाचताहेत पैसे...
तक्रारदाराने तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते. त्यानुसार, ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच तत्काळ फ्रीझ करण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. 

बँकेचे सहकार्य महत्त्वाचे
नागरिकांनी कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यास गोल्डन अवरमुळे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच बँकांचे सहकार्यही महत्त्वाचे असते.

Web Title: Challenge of cybercrime remains; 323 cases filed, only 21 cases solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.