Longest Prison Sentence: १६,००० हून अधिक लोकांची फसवणूक, १,४१,०७८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे संपूर्ण प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:12 IST2023-08-02T16:11:06+5:302023-08-02T16:12:57+5:30
एवढा मोठ्या तुरुंगवासाची शिक्षा वाचल्यानंतर तुम्हाला जरा आश्चर्य वाटले असेल, पण आश्चर्य वाटण्याची गरज नाही कारण, असा फसवणुकीचा गुन्हा घडला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...

Longest Prison Sentence: १६,००० हून अधिक लोकांची फसवणूक, १,४१,०७८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे संपूर्ण प्रकरण?
एखाद्या व्यक्तीला फसवणूक केल्याबद्दल सहा महिने किंवा त्याहून अधिक १, २ किंवा पाच वर्षांची शिक्षा झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, एका महिलेला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली १ लाख ४१ हजार ७८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एवढा मोठ्या तुरुंगवासाची शिक्षा वाचल्यानंतर तुम्हाला जरा आश्चर्य वाटले असेल, पण आश्चर्य वाटण्याची गरज नाही कारण, असा फसवणुकीचा गुन्हा घडला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...
चामोय थिप्यासो (Chamoy Thipyaso) नावाच्या एका महिलेने १६,००० हून अधिक लोकांची फसवणूक केली होती. ज्यासाठी तिला १,४१,०७८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या लोकांकडून तिने जवळपास १६.५ अब्ज रुपये हडप केले होते. चामोय थिप्यासो हिने बचत योजनेच्या नावाखाली आपल्या फसवणुकीचा डाव रचला होता. फायनान्स कंपनी आणि गुंतवणूक योजना चालवून तिने लोकांना फसवले होते. दरम्यान, भारतात या बचत योजनांना 'चिट फंड' म्हणून ओळखले जाते.
डेली मेलच्या वृत्तानुसार, थायलंडच्या चामोय थिप्यासो हिला न्यायालयाने १९८९ मध्ये शिक्षा सुनावली होती. तिने 'चिटफंड' कंपनीच्या माध्यमातून भारतातील केरळमधील अनेक लोकांची सुद्धा फसवणूक केली होती. हायफाय शौक असलेल्या आणि उच्चभ्रू वर्गात राहणाऱ्या या महिलेने गुंतवणुकीच्या मोबदल्यात लोकांना करोडपती बनवण्याचे स्वप्न दाखवले होते. गुंतवणुकीच्या बदल्यात तुम्हाला असे बाँड दिले जातील, जे काही काळानंतर जास्त परतावा देऊ लागतील, असे चामोय थिप्यासो म्हटले होते.
कसा केला घोटाळा?
चामोय थिप्यासो तेव्हा थायलंडची सरकारी तेल कंपनी पेट्रोलियम अथॉरिटी ऑफ थायलंडची कर्मचारी होती. ही कंपनी आता PTT म्हणून ओळखली जाते. घोटाळा कायदेशीर दिसण्यासाठी चामोय थिप्यासोने रॉयल थाई एअर फोर्समधील कनेक्शनचा वापर केला. कागदपत्रांवर सरकारी कंपनीचे नाव लिहिण्यात आल्याने हजारो लोक तिच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. थायलंडमधील बड्या व्यक्तींची नावे गुंतवणुकीच्या नावाखाली लुटण्यात आली. मात्र, १९८० मध्ये या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर चिटफंड कंपनी बंद करण्यात आली आणि आरोपी महिलेला तुरुंगात टाकण्यात आले. या आरोपावरून तिला मोठी शिक्षा झाली. पण तिने फक्त आठ वर्षे तुरुंगवास भोगला. त्यावेळी, थायलंडमधील कायद्याने फसवणुकीसाठी दोषी ठरलेल्यांनाच जास्तीत जास्त २० वर्षांची शिक्षा भोगण्याची परवानगी दिली होती. शेवटी, ती एका दशकापेक्षा कमी कालावधीत तुरुंगातून बाहेर पडली.