"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:36 PM2024-10-04T13:36:56+5:302024-10-04T13:40:37+5:30

चंदन वर्माच्या व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Chandan Verma whatsapp status before amethi teachers family murder | "आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस

"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस

अमेठीच्या शिवरतनगंज भागात पती, पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी आरोपी चंदन वर्माचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. याच दरम्यान, चंदन वर्माच्या व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. चंदनने स्टेटसमध्ये लिहिलं होतं की, "आज ५ लोक मरणार आहेत, मी तुम्हाला लवकरच दाखवतो."

असं सांगितलं जात आहे की, गुन्हा केल्यानंतर चंदन वर्माला स्वत:वरही गोळी झाडायची होती, कदाचित त्यामुळेच त्याने आपल्या स्टेटसवर ५ जणांना मारणार असल्याचं लिहिलं होतं. सध्या पोलीस चंदनच्या शोधात छापे टाकत आहेत. रायबरेली आणि अमेठी पोलिसांची संयुक्त पथके छापेमारी करत आहेत.

आतापर्यंतच्या तपासात या हत्या प्रकरणात नाव असलेला रायबरेली येथील रहिवासी चंदन वर्मा याने शिक्षक आणि त्याच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. चंदन एकटाच बुलेट घेऊन शिक्षक सुनील कुमार यांच्या वस्तीत पोहोचला होता. त्यानंतर त्याने घटनास्थळापासून सुमारे २० मीटर अंतरावर बुलेट पार्क केली आणि घराच्या आत गेला.

चंदन वर्माने चार जणांची हत्या करताना अनेक राऊंड गोळ्या झाडल्या होत्या, ज्यांचे शेल घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, शिक्षकाला एक गोळी लागली, तर पत्नीला दोन गोळ्या लागल्या. त्याचवेळी प्रत्येकी एक गोळी मुलींना लागली.

काही दिवसांपूर्वी सुनील कुमारची पत्नी पूनम भारती हिने रायबरेलीमध्ये चंदन वर्मा यांच्या विरोधात विनयभंग, मारहाण आणि एससी-एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी चंदन वर्माला अटक करून तुरुंगात पाठवले. आता सुनील कुमार आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालण्यात आल्याने पोलीस या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चंदन हा रायबरेलीच्या तिलिया कोट परिसरात भाड्याने राहत होता. ज्या दिवशी सुनीलची पत्नी पूनम हिने चंदनवर आरोप केले त्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली. पूनम भारती हिने चंदनवर आरोप केला होता की, १८ ऑगस्ट रोजी ती आपल्या मुलांसाठी औषधं आणण्यासाठी गेली होती. यादरम्यान चंदनने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि तिने विरोध केला असता चंदनने तिला आणि तिच्या पतीला मारहाण केली. 

Web Title: Chandan Verma whatsapp status before amethi teachers family murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.