चंदेरी दुनियेआड सुरू असलेल्या पॉर्न फिल्म प्रोडक्शनचा पर्दाफाश, दोन अभिनेत्यांसह पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:31 AM2021-02-06T04:31:21+5:302021-02-06T04:32:11+5:30
porn film production exposed : मुंबईच्या चंदेरी दुनियेत काम करण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुण, तरुणी पॉर्न फिल्म प्रोडक्शनच्या शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या कारवाईतून समाेर आली.
मुंबई : मुंबईच्या चंदेरी दुनियेत काम करण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुण, तरुणी पॉर्न फिल्म प्रोडक्शनच्या शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या कारवाईतून समाेर आली. चित्रपट, मालिका तसेच वेब सिरीजमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणींचे अश्लील व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करून लाखोंची कमाई करणाऱ्या दोन अभिनेत्यांसह पाचजणांना अटक करण्यात आली.
या टोळीबाबत माहिती मिळताच, मालमत्ता कक्षाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने, अमित भोसले, योगेश खानुरे, अर्चना पाटील, सोनाली भारते आणि अंमलदार यांनी गुरूवारी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे छापा टाकला. तेव्हा लाईटच्या प्रकाशात अर्धनग्न अवस्थेत तरुण, तरुणींचे अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी पथकाने दोन महिलांसह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात फोटोग्राफर, ग्राफिक डिझायनर, दोन अभिनेता आणि कॅमेरामनचा समावेश आहे. ही टोळी मुंबई उपनगर तसेच इतर ठिकाणी बंगले भाड्याने घेऊन तेथे पॉर्न साईट व मोबाईल ॲप्लिकेशनवर अपलोड करण्यासाठी अश्लील चित्रीकरण करत होती. यात अनेक गरीब व गरजू तरुण-तरुणी अडकले असून, पाेलीस अधिक तपास करत आहेत.
दोन वर्षांत शेकडो तरुण-तरुणी शिकार
गेल्या दोन वर्षात या ठगांच्या जाळयात शेकडो तरुण-तरुणी अडकले आहेत. यात अल्पवयीन मुलांचाही वापर करण्यात आला आहे का? याबाबत मालमत्ता कक्ष अधिक तपास करत आहे.
चित्रपटातल्या ‘ब्रेक’मुळे आयुष्य उद्ध्वस्त
चित्रपटाचे शुटिंग सुरु असल्याचे सांगत, तरुण-तरुणी ठगांच्या जाळयात अडकताच, त्यांना लाईट, कॅमेरा, ॲक्शन आड़ नग्नावस्थेत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसात तक्रार देण्याची धमकीही देण्यात येत होती.