Chandigarh Hit And Run Case: हिट अँड रन...कुत्र्याला बिस्कीट देत होती 25 वर्षीय तरुणी, भरधाव थारने उडवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 01:31 PM2023-01-16T13:31:39+5:302023-01-16T13:32:23+5:30
Chandigarh Hit And Run Case: याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.
Hit and Run case: चंदीगडमध्ये शनिवारी रात्री एका भीषण हिट अँड रन प्रकरणात 25 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी रात्री रस्त्यावर उभी राहून कुत्र्यांना बिस्कीट खाऊ घालत होती, यावेळी एका भरधाव थार गाडीने तिला चिरडलं आणि पळून गेली. चंदीगडमधील फर्नीचरवाला मार्केटमध्ये हा अपघात घडला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
रुग्णालयात उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विता कौशल(25) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. शनिवार रात्री 11:39 वाजता तेजस्विता फर्नीचरवाला मार्केटमध्ये रस्त्यावरील कुत्र्यांना बिस्कीट देत होती. यावेळी एका भरधाव थार गाडीने तिला उडवलं. यानंतर चालक गाडी घेऊन फरार झाला. सध्या जीएमएसएच-16 रुग्णालयात तेजस्वितावर उपचार सुरू आहेत. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, दोन्ही बाजूने टाके मारावे लागले आहेत.
रोज कुत्र्यांना अन्न देते
याप्रकरणी सेक्टर-61 पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघाताची सीसीटीव्ही फुटेज तरुणीचे वडील ओजस्वी कौशलने मिळवली. धडक दिल्यानंतर थार ड्रायव्हर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तेजस्विताच्या वडिलांनी सांगितले की, तेजस्विता आर्किटेक्टमध्ये ग्रॅज्युएट असून, सध्या यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. ती दररोज रात्री आपल्या आईसोबत रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देते.