चांदीवाल आयोगात गाठीभेटी अन् मोबाइलवर निर्बंध; अनिल देशमुखांवर कारागृह शासनाची बंधने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:36 AM2022-02-04T08:36:44+5:302022-02-04T08:36:54+5:30
पत्राची प्रत आयोगातर्फे देशमुख आणि पालांडे यांना आज ते आयोगात आलेले असताना देण्यात आली. पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.
मुंबई: न्या. कैलाश चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात असताना मोबाइल वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही, नातेवाइकांना भेटता येणार नाही वा घरचे जेवतादेखील येणार नाही, अशी बंधने आर्थर रोड कारागृह प्रशासनाने घातली आहेत.
आर्थर रोड कारागृहातून देशमुख आणि त्याचे तत्कालीन स्वीय सहायक संजीव पालांडे यांना आयोगासमोर नेण्याचे व आणण्याचे काम जे पोलीस पथक करते त्या पथकास कारागृह अधीक्षकांनी पत्र दिले असून त्यात या बंधनांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. कारागृह अधीक्षकांच्या पत्राची एक प्रत आयोगाच्या कार्यालयास गुरुवारी देण्यात आली. या बंधनांची अंमलबजावणी पथकातर्फे केली जाणार आहे. पत्राची प्रत आयोगातर्फे देशमुख आणि पालांडे यांना आज ते आयोगात आलेले असताना देण्यात आली. पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.
एटीएसचा तो अहवाल आयोगास सादर-
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या चौकशीचा ८०४ पानांचा अहवाल एटीएसने आयोगास सादर केला आहे.