Chandrapur: चंद्रपूरच्या घटनेमागे ३० वर्षांपूर्वीच्या बुरसटलेपणाची कहाणी; आंध्रप्रदेश कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 09:29 AM2021-08-24T09:29:47+5:302021-08-24T09:31:02+5:30

भानामतीच्या संशयावरून मारहाण. अंगात कथित भानामती संचारलेल्या महिलांना पोलिसांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठविले. गरज भासल्यास त्यांना अटक करण्यात येणार असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले.

Chandrapur black magic case: Bhanamati beaten incident story has 30 years history | Chandrapur: चंद्रपूरच्या घटनेमागे ३० वर्षांपूर्वीच्या बुरसटलेपणाची कहाणी; आंध्रप्रदेश कनेक्शन

Chandrapur: चंद्रपूरच्या घटनेमागे ३० वर्षांपूर्वीच्या बुरसटलेपणाची कहाणी; आंध्रप्रदेश कनेक्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भानामतीच्या संशयावरून महिला - वृद्धांना मारहाण प्रकरणाला ३० वर्षांपूर्वीची पार्श्वभूमी असल्याची बाब पुढे आली आहे. मारहाण झालेल्या सात जणांपैकी एका वृद्धाला ३० वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील एका गावातून करणी करण्याच्या अंधश्रद्धेतून बहिष्कृत केले गेले होते. त्यानंतर वणी खुर्द येथील नातेवाईकांनी तेथे जाऊन त्या वृद्धाला लपूनछपून गावाला आणले होते. तसेच मारहाण झालेल्यांपैकी शांताबाई कांबळे यांना सुमारे १५ वर्षांपूर्वी केकेझरी येथून गावकऱ्यांनी अशाच बुरसटलेपणातून गावाबाहेर काढले होते. त्यासुद्धा वणी खुर्द येथे वास्तव्यास आल्या. ही बाब गावकऱ्यांना माहिती होती. त्यामुळे कथित अंगात संचारणाऱ्या महिलांनी जेव्हा त्यांची नावे घेतली, तेव्हा जमावानेही मागचा-पुढचा विचार केला नाही.

अंगात कथित भानामती संचारलेल्या महिलांना पोलिसांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठविले. गरज भासल्यास त्यांना अटक करण्यात येणार असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे पोलिसांची छोटीशी चूकही अंगलट येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन जिवती, टेकामांडवा, पाटण व गडचांदूर येथून अधिकची पोलीस कुमक मागवण्यात आली होती.
गावात सोमवारी तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांचा कडक बंदोबस्त असून बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला गावात जाण्यापासून रोखण्यात येत आहे.

हे आहेत आरोपी 
सुग्रीव शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, दादाराव कोटंबे, बालाजी कांबळे, अमोल शिंदे, गोविंद येरेकर, केशव कांबळे, सूरज कांबळे, संतोष पंचाल, माधव तेलंग, दत्ता भालेराव व सिद्धेश्वर शिंदे (सर्व रा. वणी खुर्द). आरोपींविरुद्ध १४३, १४७, १४९, ३२५, ३४२ आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये काही जण दलित असल्याने ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला नसल्याचे नायक यांनी सांगितले.

चंद्रपुरातून वाहन नेले
कायद्यानुसार आरोपीला न्यायालयात नेताना प्रत्येकासोबत एक व्यक्ती असायला हवी. ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूरहून ४० सीटर वाहन नेण्यात आले. जिवती हे दुर्गम भागात असून, अनेक अडचणींचा सामना करीत आरोपींना सुमारे ४५ किमी अंतरावरील राजुरा येथील न्यायालयात आणले.

आरोपी झालेे फरार
चंद्रपूर येथून अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल दहागावकर, धनंजय तावाडे यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी गावकऱ्यांचे ब्रेनवाॅश करीत या प्रकारामागील वस्तुस्थिती मांडली. ही बाब काही जणांना पटली. यानंतर काही जण तक्रार देण्यास पुढे येताच पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. 

Web Title: Chandrapur black magic case: Bhanamati beaten incident story has 30 years history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस