स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; १५ शहरांत हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 08:25 PM2019-08-11T20:25:47+5:302019-08-11T22:36:20+5:30
१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होऊ शकतो दहशतवादी हल्ला
मुंबई - नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० हटवल्याने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. विशेषतः नवी दिल्लीतील लाल किल्ला मुख्यत्वेकरून दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी मिळाली आहे. याठिकाणी दहशतवादी आयईडी, सरकारी गाडी किंवा गणवेश याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह नवी दिल्ली आणि इतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
उद्या १२ ऑगस्टला बकरी ईद आणि त्यानंतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असे देशात दोन मोठे सण आहेत. याच पार्श्वभूमीवर हा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर देशातील १५ मोठ्या शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कलम ३७० हटवल्याने काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरे ही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता पसरली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि सर्व परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काश्मीर दौऱ्यावर आहेत. आयबीच्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राजधानी दिल्लीत 'जैश - ए- मोहम्मद' ही दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. या बाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.