नागपुरातील सुरेंद्रनगरात गुंडांचा हैदोस : वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 09:51 PM2020-01-02T21:51:43+5:302020-01-02T21:54:08+5:30

सुरेंद्रनगर गार्डनजवळ पार्क केलेल्या चार वाहनांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. गुरुवारी सकाळी ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला.

Chaos of goons in Surendranagar at Nagpur: Vehicles vandalized | नागपुरातील सुरेंद्रनगरात गुंडांचा हैदोस : वाहनांची तोडफोड

नागपुरातील सुरेंद्रनगरात गुंडांचा हैदोस : वाहनांची तोडफोड

Next
ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुरेंद्रनगर गार्डनजवळ पार्क केलेल्या चार वाहनांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. गुरुवारी सकाळी ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला.
बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रनगरात (तात्या टोपेनगरातील गार्डनजवळ) संजय सदूजी सोमकुंवर राहतात. बुधवारी रात्री त्यांनी आणि त्यांच्या तीन शेजाऱ्यांनी आपापली वाहने घराच्या बाजूला उभी ठेवली. बुधवारी मध्यरात्री गार्डनजवळ दारूच्या नशेत तीन ते चार जणांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, कडाक्याची थंडी आणि पहाटेच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिक आपापल्या घरात दडून होते. गुरुवारी सकाळी सोमकुंवर आणि त्यांचे शेजारी जागे झाले असता त्यांना वाहनांची तोडफोड झालेली दिसली. समाजकंटकांनी एकूण चार कार फोडल्या. काहींच्या समोरच्या तर काही कारच्या मागच्या आणि साईडच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. काचेच्या तुकड्यांचा सडा बघून समाजकंटकांनी काचांवर जड वस्तूचे अनेक फटके हाणल्याचे लक्षात येत होते. वाहनांच्या तोडफोडीचे वृत्त पसरताच परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली. एकाने नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर बजाजनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्याआधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

मारहाण अन् आरोपी
घटनास्थळाजवळ असलेल्या एका सीसीटीव्हीत आपसात हाणामारी करणारे तीन समाजकंटक आणि त्यानंतर एकाकडून झालेली वाहनांची तोडफोड कैद झाल्याचे समजते. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती उघड केली नाही. मात्र, वाहनांची तोडफोड करणारा आरोपी पिवळ्या रंगाचा शर्ट घालून असल्याचे सांगितले जाते. सोमकुवर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: Chaos of goons in Surendranagar at Nagpur: Vehicles vandalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.