नागपूर महापालिकेतील राडा : नगरसेवक बंटी शेळकेंसह अनेकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 08:16 PM2019-11-21T20:16:01+5:302019-11-21T20:18:19+5:30
महापालिकेत राडा केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १५ ते २० काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत राडा केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १५ ते २० काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
काँग्रेसचे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते तानाजी शुक्लाजी वनवे (वय ६३, रा. दर्शन कॉलनी, नंदनवन) यांच्या कक्षात शिरून बंटी शेळके, तौफिक खान, पूजक मदने, अक्षय घोटाळे, राजू बोकळे आणि त्यांच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी २ वाजता प्रचंड गोंधळ घातला होता. वनवे यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी करून आरोपींनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले होते. त्यांच्या कक्षातील काचेची तावदाने, खुर्च्यांची तोडफोडही केली होती. या प्रकरणाने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. वनवे यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी बुधवारी रात्री या प्रकरणात नगरसेवक बंटी शेळके आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती.