Lulu Mall Lucknow: लखनऊच्या लुलू मॉलबाहेर गोंधळ, हनुमान चालीसा पठणासाठी आलेल्या १५ जणांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 02:41 PM2022-07-16T14:41:02+5:302022-07-16T14:42:27+5:30
Lulu Mall Lucknow:आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आंदोलक जय श्री रामच्या घोषणा देत होते.
उत्तर प्रदेशच्या राजधानीतील लुलू मॉलबाहेर हिंदू महासभेच्या लोकांनी पुन्हा एकदा निदर्शने केली आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आंदोलक जय श्री रामच्या घोषणा देत होते.
स्वतःला हिंदू संघटना म्हणवून घेणाऱ्या आदित्य मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांनी मॉलबाहेर निदर्शने केल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सुमारे १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
आंदोलकांना मॉलमध्ये हनुमान चालीसा वाचायची होती
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक हनुमान चालीसा वाचण्यासाठी मॉलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी विरोधही सुरू केला. माहिती मिळताच आलेल्या पोलिसांना पाहताच काही आंदोलक पळू लागले. काही वेळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरु होती. यानंतर पोलिसांनी मॉलभोवती धावणाऱ्या आंदोलकांना पकडले. याआधीही हिंदू महासभेच्या लोकांनी लुलू मॉलबाहेर निदर्शने केली होती. महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता मॉलमध्ये सुंदरकांड पठण करण्याची घोषणा केली होती. पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले असले, तरी परवानगीशिवाय मॉलमध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी आलेल्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली.
वाद कसा सुरू झाला?
रविवारी, १० जुलै रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लुलू मॉलचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर, मंगळवारी, १२ जुलै रोजी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये काही लोक लुलू मॉलच्या कॅम्पसमध्ये नमाज अदा करताना दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखिल भारत हिंदू महासभेने तीव्र आक्षेप घेतला होता. हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी म्हणाले होते, 'लोकांनी लुलू मॉलमध्ये जमिनीवर बसून नमाज अदा केली, या व्हिडिओने हे सिद्ध केले की लुलू मॉलमध्ये सरकारी आदेशांचे उल्लंघन होत आहे.
लुलु मॉल हा देशातील सर्वात मोठा मॉल आहे
लुलू मॉल हा देशातील सर्वात मोठा मॉल आहे, जो सुशांत गोल्फ सिटीमध्ये बांधला गेला आहे. हा मॉल 2.2 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये बांधला आहे. येथील सर्वात खास म्हणजे लुलु हायपर मार्केट. यासोबतच अनेक ब्रँडचे शोरूमही उघडण्यात आले आहेत. मॉलमध्ये 15 रेस्टॉरंट आणि कॅफे आहेत. 25 ब्रँड आउटलेटसह एक फूड कोर्ट देखील आहे, ज्यामध्ये 1600 लोक एकत्र बसू शकतात.