भिवंडीत साडेतीन लाखांचा चरस जप्त; शांतीनगर पोलीसांची कारवाई
By नितीन पंडित | Published: December 7, 2022 06:32 PM2022-12-07T18:32:55+5:302022-12-07T18:33:31+5:30
झोपडपट्टी विभागातून मोठ्या प्रमाणावर सुरू होती बेकायदेशीरपणे विक्री
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात विविध कामगार वस्ती असलेल्या झोपडपट्टी विभागातून मोठ्या प्रमाणावर चरस गांजा बेकायदेशीरपणे विक्री केला जात आहे.भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आपापल्या विभागात दैनंदिन गस्त, नाकाबंदी वाढविण्यासोबतच गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेऊन बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्या नंतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तब्बल ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा ३५७ ग्रॅम वजनाचा चरस मंगळवारी जप्त केला आहे.
भादवड येथील सार्वजनिक शौचालयाचे पाईपलाईनचे उताराजवळ एक इसम चरस विक्री करता घेऊन येत असल्याचे समजल्यानंतर शांतीनगर पोलीस पथकाने घटनास्थळी सापळा रचून संशयित शफिक मिरासाहेब शेख,वय २६ रा.नेहरू नगर,नवीवस्ती यास ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या जवळून ३५७ ग्रॅम वजनाचा चरस हा शरीरास अपायकारक असलेला मादक पदार्थ जप्त केला आहे .त्या सोबत ६० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शांतीनगर पोलिसांकडून आरोपीस अटक करण्यात आली आहे .