डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी ३ आरोपी डॉक्टरांविरोधी आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 05:41 PM2019-07-23T17:41:19+5:302019-07-23T17:48:24+5:30
मुंबई गुन्हे शाखेने जवळपास २ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात आरोपी डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल, भक्ती मेहेर यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेने जवळपास २ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईतील बहुचर्चित डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जवळपास २ हजार पानी दोषारोपपत्र तयार केलं असून हे आरोपपत्र सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं आहे. यात पायलच्या सुसाइड नोटचाही समावेश आहे. ही सुसाइड नोट पायलच्या मोबाइलमध्ये पोलिसांना आढळून आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डाॅ. पायल तडवीने २२ मे रोजी हाॅस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. पायलच्या आत्महत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभर उठले होते. पायलच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या तिन्ही महिला डाॅक्टर हेमा अहुजा, भक्ती मेहर, अंकिता खंडेलवाल यांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलिसांना पायलच्या मोबाइलमध्ये तिने लिहिलेली ३ पानांची सुसाइड नोट आढळून आली. त्या सुसाइड नोटमध्ये तिने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केल्याप्रकरणी कुटुंबांची आणि नवऱ्याची माफी मागितली आहे. या दोषारोपपत्रात पोलिसांनी ५० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यात डाॅ. अहुजा आणि तडवीमध्ये झालेलं मोबाइल संभाषण, पायलसोबत शिक्षण घेणारे विद्यार्थी, पायलचे नातेवाईक, वरिष्ठ डाॅक्टरांचा जबाब हे महत्वाचे पुरावे पोलिसांनी दोषारोपत्रात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पायल तडवी आत्महत्या प्रकरण: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तीन आरोपी डॉक्टरांविरोधात आरोपपत्र दाखल https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2019
Payal Tadvi suicide case: Mumbai Police Crime Branch has filed charge-sheet against the three accused doctors in the case.
— ANI (@ANI) July 23, 2019