खाण घोटाळा प्रकरणात कॅनडा कंपनीच्या 4 संचालकांवर आरोपपत्र, खटला उत्तर गोव्यात वर्ग करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 02:32 PM2020-11-05T14:32:39+5:302020-11-05T14:33:16+5:30
काडणेकर प्रकरण पुन्हा उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायालयात वर्ग करावे, अशी मागणी पोलिसांनी बुधवारी न्यायालयात केली.
मडगाव: सर्वात मोठा खाण घोटाळा झाल्याचे सांगितले जाते, त्या मायणा केपे येथील काडणेकर खाण घोटाळा प्रकरणात एसआयटीने कॅनडाच्या 'तेर्रा नोव्हा रॉयल्टी कॉर्पोरेशन' कंपनीच्या 4 संचालकांवर मडगाव न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात मायकल स्मिथ यांचाही समावेश आहे.
डॉ. प्रफुल्ल हेदे प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह तिघांना निर्दोष मुक्त करताना न्या. एडगर फर्नांडिस यांनी आपण एमएमडीआर कायद्याखालील आरोपावर सुनावणी घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे, काडणेकर प्रकरण पुन्हा उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायालयात वर्ग करावे, अशी मागणी पोलिसांनी बुधवारी न्यायालयात केली.
काडणेकर प्रकरणात यापूर्वी एसआयटीने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह एकूण 13 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. सोमवारी त्या आरोपपत्राला पुरवणी आरोपपत्र जोडताना कॅनडाच्या कंपनीचे चेअरमन स्मिथ यांच्यासह रॉबर्ट्स रिग्स , डॉ. शुमिंग झाओ आणि इंद्रजित चॅटर्जी या संचालकांवर आरोप ठेवले आहेत.
एसआयटीच्या दाव्याप्रमाणे या कॅनडाच्या कंपनीने मॅग्नम मिनरल्स या नावाने गोव्यात कंपनी सुरू करून 1983 ते 2007 पर्यंत बंद असलेली काडणेकर खाण बेकायदेशीररित्या सुरू करून उत्खनन केले. गोव्यातील ही कंपनी एका सीएच्या कार्यालयाच्या पत्त्यावर उघडण्यात आली होती. उत्खनन बंद झाल्यावर गोव्यातील ही कंपनी गुंडाळण्यात आली.
या प्रकरणात याआधी कामत यांच्या व्यतिरिक्त काडणेकर कुटुंबीय, मॅग्नमचे संचालक रवींद्र प्रकाश व प्रशांत साहू तसेच खाण खात्याचे हेक्टर फेर्नांडिस यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. एसआयटीचे पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत हे या प्रकरणी तपास अधिकारी आहेत.