पतीचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या पत्नीच्याविरोधात आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 06:24 PM2018-09-11T18:24:28+5:302018-09-11T18:24:51+5:30
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला खून, अन्य तीन साथीदारांविरोधात खुनाचे आरोप
मडगाव - आपल्या प्रेम प्रकरणात व्यत्यय आणत असल्याने आपल्या पतीचाच आपल्या मित्रच्या सहाय्याने खून केल्याचा आरोप असलेल्या पत्नी कल्पना बारकी व तिचे साथीदार पंकज पवार, सुरेशकुमार सोळंकी व अब्दुल करीम शेख या चौघांविरोधातील खळबळ माजविणारे प्रकरण सध्या मडगावच्या सत्र न्यायालयात पोहोचले असून या प्रकरणात कुडचडे पोलिसांनी चारही जणांवर गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून खून केल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे. या अत्यंत गाजलेल्या प्रकरणाच्या सुनावणीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी म्हणजे आरोपी पत्नी कल्पनाने आपला पती बसवराज बारकी याचा 2 एप्रिल 2018 रोजी खून करुन धारदार कोयता व कटरने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन मोले जंगल परिसरात दरीत फेकून दिले होते. मात्र, या खूनाला तब्बल एका महिन्याने वाचा फुटली होती. हा खून स्वत:च्या डोळ्यांनी पहाणाऱ्या एका महिलेने एका पत्रकार महिलेला ही खबर दिल्यानंतर त्या महिला पत्रकाराने कुडचडे पोलिसांना सतर्क केल्यानंतर हा खून उघड झाला होता. कुडचडे पोलिसांनी या प्रकरणात चारही आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 302 (खून करणे), 201 (पुरावे नष्ट करणे) व 120 -ब (गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे) या गुन्हय़ाखाली आरोपपत्र दाखल केले आहे. अब्दुल करीम शेख व पंकज गणा पवार या दोघांनी आपल्याला जामीन मिळावा, यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त न्यायालयाने फेटाळून लावला होता.
मयत बसवराज बारकी हा म्हापसा येथे एका कंपनीत वाहनचालक म्हणून कामाला होता. तर त्याची पत्नी कल्पना बारकी ही कुडचडे येथे एका भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये रहात होती. पत्नीपासून दूर रहाणारा बसवराज महिन्यातून 15-20 दिवसांनी एकदा घरी यायचा. दरम्यानच्या काळात कल्पनाचे इतर संशयितांशी संबंध जुळले होते. याच संबंधावरुन त्या दोघांमध्ये अधूनमधून वादही होतं.
2 एप्रिल 2018 रोजी बसवराज कुडचडे येथील आपल्या फ्लॅटवर आला असता, तो दारुच्या नशेत असताना त्याचा व कल्पनाचा वाद झाला. या वादातून भडकलेल्या कल्पनाने आपल्या पतीचा नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर आपल्या मृत पतीचे छायाचित्र व्हॉटस्अॅपवरुन आपल्या मित्रांनापाठवून तिने त्यांना घरी बोलावून घेतले. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कोयता व कटरने मृतदेहाचे तीन तुकडे करुन तीन वेगवेगळ्या पोत्यात भरुन ते मोले येथील जंगलातील दरीत फेकून दिले. या कामासाठी त्यांना आणखी एक वाहनचालक अब्दुल शेख याचे सहाय्य मिळाले. अब्दुलनेच आणलेल्या वाहनाने कुडचडेतून मृतदेहाचे हे तुकडे मोलेर्पयत नेण्यात आले होते