सायबर पोलिसांकडून चार दिवसांत दोषारोपपत्र दाखल; एकतर्फी प्रेम करणाऱ्याचा झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 03:49 AM2020-10-16T03:49:29+5:302020-10-16T03:49:43+5:30
फेसबुकवर विवाहितेच्या बदनामीचे प्रकरण : आरोपी संतोषविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून मेमध्ये सेवली ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
औरंगाबाद : फेसबुक या समाज माध्यमावर विवाहितेचे बनावट अकाऊंट उघडून तिचे मार्फिंग केलेले अश्लील छायाचित्रे अपलोड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. सायबर पोलिसांनी तपास करून चार दिवसांत त्याला दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा प्रकारे प्रथमच सायबर गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीविरुद्ध चार दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
संतोष शेषराव डिघुळे (रा. पिंपळेवाडी, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. फेसबुकवर दोन बनावट अकाऊंट उघडून छायाचित्रे आणि मोबाईल नंबर अपलोड केल्याची तक्रार एका विवाहितेने सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. ७ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दुसºया दिवशी आरोपी संतोषला सायबर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. कोठडीदरम्यान पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा पीडितेवर त्याचे प्रेम असल्याचे तो म्हणत होता. तिने दुसऱ्या व्यक्तीसोबत केलेले लग्न त्याला मान्य नसल्याचे तो म्हणाला. तिला अद्दल घडविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचा युक्तिवाद तो करीत होता. विशेष म्हणजे तो विवाहित असून जालना येथील एका खासगी बँकेत नोकरी करतो.
सुधारणा केली असती तर... : आरोपी संतोषविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून मेमध्ये सेवली ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. या कारवाईचा कोणताही परिणाम त्याच्यावर झाला नाही. उलट त्याने तिला फेसबुकच्या माध्यमातून त्रास देणे सुरूच ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्यामुळे पीडितेच्या संसारात विघ्न आले.