बहुचर्चित घाटकोपर हिरे व्यापारी हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 06:05 PM2019-03-06T18:05:22+5:302019-03-06T18:10:32+5:30
आरोपपत्रात आरोपींचे टाॅवर लोकेशन आणि गुन्ह्यात वापरलेली कार हे महत्वाचे पुरावे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई - बहुचर्चित घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी काल सातही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत. सध्या हे सात आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन पवार याने उदानी यांचा त्याच्या प्रेयसीवर असलेली वाईट नजर आणि अवघ्या ५० हजार रुपयांसाठी हत्या केल्याचे १३३० पानी आरोपपत्रात म्हटलं आहे. या आरोपपत्रात पोलिसांनी २०४ साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे. आरोपपत्रात आरोपींचे टाॅवर लोकेशन आणि गुन्ह्यात वापरलेली कार हे महत्वाचे पुरावे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पंतनगर परिसरत राहणारे राजेश्वर किशोरलाल उदानी (५७) यांचं घाटकोपर परिसरात सोने विक्रीचं दुकान आहे. उदानी २८ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त घराबाहेर जात असल्याचं सांगून घराबाहेर पडले. मात्र दुसरा दिवस उजाडला तरी ते घरी आले नाही. आरोपी सचिन याने शाहिस्ता आणि निकत या दोघींचे फोटो दाखवून त्याला बोलवून घेतले. उदानी यांना जी गाडी घेण्यासाठी आली होती. त्यात प्रणित भोईर आणि निकेत ही होती. प्रणित हा उदानी यांना घेऊन नवी मुंबईतल्या रबाळे स्थानकावर आला. त्याठिकाणी उदानी यांच्या गाडीत दिनेश पवार, सिद्धेश पाटील, महेश भोईर यांनी उदानी यांच्या तोडात केक कोंबून त्यांची गळा आवळून हत्या केली. तसेच त्यांच्या अंगावरील मौल्यवान दागिने आणि पैसे काढून घेतले. त्यानंतर या आरोपींना उदानीचा मृतदेह पनवेलजवळील देहरंग येथील तलावाजवळील झुडपात नग्न अवस्थेत टाकून तेथून पळ काढला. बेपत्ता उदानींच्या कुटुंबीयांनी २९ नोव्हेंबर पंतनगर पोलिसात ते बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती.
सचिनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सचिनची जवळची मैत्रिण अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिच्यावर उदानी यांची वाईट नजर होती. वारंवार उदानीला समजावून देखील उदानी तिला फोनवरून मेेसेज पाठवायचा. तसेच उदानीने त्याच्या मुलीच्या लग्नात इव्हेंट मेनेजमेन्टचे काम सचिनला दिले होते. त्यावेळी सचिने उदानी यांच्याकडून ५० हजार जास्त घेतले. ही बाब उदानीला कळाल्यानंतर त्याने सचिनकडे पैशासाठी तगादा लावला होता. यातूनच सचिनने उदानीची हत्या केल्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी आरोपत्रात म्हटलं आहे.
हत्येदरम्यान सचिन जरी उपस्थित नसला. तरी फोनवरून तो इतर आरोपींना मार्गदर्शन करत होता. उदानीची हत्या करून दिनेश हा मुरूड येथे महिला आरोपी निखितला घेऊन गेला. या हत्याकांडासाठी सर्वांनीच नवीन सीमकार्ड घेतले होते. विशेष म्हणजे या हत्याकांडानंतर सर्वांनी आपले मोबाइल सिमकार्ड आणि अंगावरील कपडे ही जाळत पुरावे नष्ट केले. मात्र, या सर्वांनी उदानी यांना मारण्यासाठी जी गाडी वापरली. ती गाडी दोन दिवसांपूर्वी आरोपींनी एका मॅकेनिककडे सर्विसिंगसाठी दिली होती. त्या ठिकाणी मॅकेनिकच्या न कळत त्यांनी दुसऱ्या गाडीची नंबरप्लेट स्वत:च्या गाडीला लावून स्वत:ची नंबरप्लेट तेथेच सोडून गेल्याने पोलिसांच्या जाळ्यात हे सर्व सहज अडकले. उदानीची हत्या झाल्याचे कळताच सचिनने कुणालाही संशय येऊ नये म्हणून देबोलिनासोबत तिच्या मूळगावी आसाम गुवाहाटी येथे पळ काढला. देबोलिनाच्या जबाबातून ही बाब पुढे आली आहे.