लाचखोर स्वस्त धान्य दुकानदार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 10:24 AM2021-05-22T10:24:30+5:302021-05-22T10:24:37+5:30
Bribe Case : धान्य ७ रुपये किलो ऐवजी २ रुपये किलोने देण्यात येणारे राशन कार्ड बनविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली.
अकोला : सिंधी कॅम्प येथील एका रास्त भाव धान्य दुकानदाराने रेशन दुकानातील धान्य ७ रुपये किलो ऐवजी २ रुपये किलोने देण्यात येणारे राशन कार्ड बनविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर ५०० रुपयांची लाच स्वीकारताना या दुकानदारास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.
सिंधी कॅम्पमधील पक्की खोली परिसरात असलेल्या महात्मा फुले नगर येथे उत्तम बळीराम सरदार (वय ७१ वर्षे) हे स्वस्त धान्य दुकान चालवितात. या परिसरातील एका ४६ वर्षीय इसमास दोन रुपये प्रति किलो दराने धान्याची मागणी केली; मात्र त्यांच्या राशन कार्डवर हे धान्य मिळणार नसल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यानंतर त्यासाठी वेगळे राशन कार्ड बनवावे लागते, असे दुकानदाराने म्हणताच ग्राहकाने राशन कार्ड बनवून देण्याची मागणी केली असता, दुकानदाराने एक हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, ग्राहकास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून पाचशे रुपये स्वीकारताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वस्त धान्य दुकानदार उत्तम सरदार यांना शुक्रवारी अटक केली. एका अज्ञात लोकसेवकाच्या नावाने लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी या आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.