स्वस्तात डॉलर ऐवजी द्यायचे पेपरच्या नोटा; विडीमुळे झारखंडचे त्रिकुट जाळ्यात
By मनीषा म्हात्रे | Published: September 14, 2023 06:01 PM2023-09-14T18:01:52+5:302023-09-14T18:02:40+5:30
निर्मल नगर पोलिसांची कारवाई
मुंबई : स्वस्तात डॉलर देण्याऐवजी पेपरच्या नोटा देणाऱ्या झारखंडच्या त्रिकुटाला निर्मलनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिंकू अबूताहीर शेख (२५),
मो.रेकाउल अब्दुल रहमान हक (२९) आणि जमीदार अयनुल शेख (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सिटू उर्फ सलीमचा शोध सुरु आहे. विडीच्या सवयीमुळे नेहमीप्रमाणे पानटपरीवर येताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
ठाण्यात राहणारे तक्रारदार राजीव हरिषचंद्र जैस्वाल (२७) यांना या त्रिकुटाने चार लाख किंमतीचे डॉलर दीड लाखांत देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून दीड लाख घेत त्यांच्या हाती पेपरचे कात्रण दिले. जैस्वाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी संदीप जरांडे, राजेंद्र माळी, सुशांत पाटील आणि अंमलदार यांनी तपास सुरु केला.
घटनास्थळावरील १५ ते २० सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये संशयिताचे चेहरे हाती लागताच त्यानुसार शोध सुरु केला. पुढे सीसीटीव्हीच्या मदतीनेच आरोपी ऑटोने पुढे गेल्याचे दिसले. रिक्षाचा क्रमांकावर चालकांपर्यंत पथक पोहचले. आरोपीना भांडुप खिंडीपाडा परिसरात सोडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी भांडुप परिसर पिंजून काढला. येथीलच एका पान टपरी वाल्याकडे चौकशी करताच त्यातील एक जण बिडी पिण्यासाठी नेहमी येत असल्याचे समजले. पोलिसांनी तोच धागा पकडून तेथेच तळ ठोकला. रिक्षात वेशांतर करून सापळा रचला. चार तासाने आरोपी तेथे येताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अटक आरोपींकडे पोलीस अधिक तपास करत आहे.