प्रसिद्ध सुवर्णकार पेडणेकरांची विकासकाने केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 07:54 PM2018-08-02T19:54:49+5:302018-08-02T19:55:42+5:30
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात विकासकाविरोधात गुन्हा दाखल
मुंबई - प्रसिद्ध सुवर्णकार सुधीर पेडणेकर (वय - ६५) यांच्यासह ११ जणांची दादर येथील नावलकर इमारतीचा पुनर्विकास करून घरं देण्याच्या नावाखाली एका विकासकाने २ कोटी ३९ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला असल्याचे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत गायकवाड यांनी सांगितले.
२२ ऑक्टोबर २००७ ते २८ ऑगस्ट २०१४ दरम्यान दादरमधील सिद्धेश्वर बिल्डिंग खोत येथे राहणारे सुवर्णकार सुधीर पेडणेकर आणि इतर ११ जणांना नावलकर इमारतीचा पुनर्विकास करून घरे देण्याचे आमिष दाखवून चेक आणि रोख रक्कमेद्वारे एका विकासकाने २ कोटी ३९ लाख ६२ हजार रुपये घेतले. फसवणूक करणारा विकासक दादरमधील खांडके बिल्डिंगमध्ये राहत होता. मात्र, आता तो त्या ठिकाणी राहत नसून तो वारंवार आपली ठिकाणं बदलत असून पैसे घेतलेल्यांना घरे न देता त्याने चुना लावला आहे. त्यामुळे अनेक वर्ष वाट पाहून आता सुहास पेडणेकर यांच्यासह ११ जणांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.