परदेशात नोकरी देतो बहाण्यानं फसवलं; महिलेची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
By धीरज परब | Published: March 5, 2023 01:42 PM2023-03-05T13:42:03+5:302023-03-05T13:42:14+5:30
भारतातील एजेंटने तुला ३ लाख रुपयास विकले असून आत जे काही काम सांगतील ते करावे लागेल असे ओमानी एजंटने सांगितल्यावर महिलेस धक्का बसला.
मीरारोड - परदेशात नोकरीचे आमिष दाखवून आखाती देशातील एजंटला ३ लाखांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी एक महिला व एक पुरुष अशा दोन एजंटना अटक केली आहे.
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी महिलेस आखाती भागातील ओमान - मस्कत देशात दरमहा ३० हजार पगारावर घरकामाची नोकरी देण्याचे आमिष अशरफ मैदु कैवौरा (४६ ) रा. चैट्टली , तालुका चेराळा, कर्नाटक व नमीता सुनिल मालुसरे (४६) रा. हनुमान मंदीर जवळ, जव्हार भाई प्लॉट, घाटकोपर, मुंबई यांनी दाखवले होते. ती महिला ओमान - मस्कत देशात कामास गेल्यानंतर तेथील ओमानी एजन्टला भेटली. त्यावेळी भारतातील एजेंटने तुला ३ लाख रुपयास विकले असून आत जे काही काम सांगतील ते करावे लागेल असे ओमानी एजंटने सांगितल्यावर महिलेस धक्का बसला. भारतात परत जायचे असले तर दिलेले ३ लाख रुपये परत करावे लागतील असे एजंटने सांगितले.
पूर्वी फसगत झालेल्या त्या महिलेने तिच्या ओमान - मस्कत येथील तिचे ओळखीचे व्यक्तीना घडला प्रकार सांगितला. ओळखीच्या व्यक्तींनी तिला १ लाख ६५ हजार रुपयांची मदत केली . ती रक्कम तिने ओमानी एजन्टला देवुन स्वतःची सुटका करुन घेत मायदेशी गाठले. भारतात परतल्यावर महिलेने काशीमीरा पोलीस ठाण्यात नमिता व अशरफ विरुद्ध फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप कदम, उपनिरीक्षक सुरज जगताप सह लक्ष्मण पाटील, इरफान मुलानी, दिपक वारे, सुधीर खोत यांच्या पथकाने तपास करत नमिता व अशरफ या दोघांना १ मार्च रोजी अटक केली . जगताप हे पुढील तपास करत आहेत .