सात फेरे घेऊन तिने 18 जणांना घातला गंडा, लुटारू नवरीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 10:37 AM2018-07-16T10:37:51+5:302018-07-16T10:38:08+5:30
विवाहेच्छुक तरुणांशी विवाहगाठ बांधून त्यांना गंडा घालणारी तरुणी आणि तिच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
लखनौ - विवाहेच्छुक तरुणांशी विवाहगाठ बांधून त्यांना गंडा घालणारी तरुणी आणि तिच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. छत्तीसगडमधील या टोळीची प्रमुख असलेली एक तरुणी तिचा कथित पती, एक साध्वी आणि अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लग्न झाल्यानंतर बलात्कार, अपहरण आणि जबरदस्तीने विवाह केल्याची तक्रार करण्याची धमकी देऊन ही टोळी तरुणांना लुबाडत असे, असा या टोळीवर आरोप आहे.
या टोळीची प्रमुख असलेल्या निर्मला ठाकूर हिने उत्तर प्रदेशातील बांदा येथील घनश्याम नावात्या तरुणासोबत 10 जुलै रोजी विवाह केला होता. या विवाहाच्या बदल्यात साध्वी मालती शुक्ला, ममता द्विवेदी आणि तिचा पती निरंजन द्विवेदी याने 50 हजार रुपये उकळले. या विवाहाला तीन दिवस उलटल्यानंतर निर्मलाचा कथित पती कुलदीप हा घनश्यामच्या घरी पोहोचला. तसेच निर्मलाचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याचा आरोप त्याने घनश्यामवर केला. तसेच दोन लाख रुपये न दिल्यास पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. पण घनश्यामने पैसे देण्यास नकार दिल्यावर कुलदीपने घनश्याम आणि त्याच्या भावाविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी घनश्याम आणि त्याच्या भावाला अटक केली.
ही बातमी पसरताच बांदा येथे राहणारे दिनेश पांडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच गेल्या महिन्यात मालती शुक्ला हिने एक लाख रुपये घेऊन त्यांचा विवाह निर्मला गिच्याशी करून दिल्याचे तसेच काही दिवसांनंतर निर्मला लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी निर्मला आणि तिच्या साथीदारांची उलट तपासणी घेतली असता त्यांनी आपण 18 तरुणांना गंडा घातल्याचे कबूल केले.