"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 10:48 AM2024-10-03T10:48:13+5:302024-10-03T10:49:05+5:30
फसवणूक करणारे पती-पत्नी एका राऊंडच्या थेरपीसाठी सहा हजार रुपये घ्यायचे. त्यांनी भन्नाट फायदे सांगून लोकांना आपल्याकडे आकर्षित केलं होतं.
आपण अनेकदा चित्रपटांमध्ये नवनवीन भन्नाट गोष्टी या पाहत असतो. एखादी व्यक्ती जर वृद्ध होत असेल तर तरुण दिसेल असं सांगणाऱ्या मशीन्स देखील उपलब्ध असल्याचं दाखवलं जातं. पण हे खरं नसतं. मात्र आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याच संकल्पनेचा वापर करून कानपूरमधील एका जोडप्याने शहरातील हजारो लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून हे जोडपं आता पळून गेलं आहे.
पीडित महिलेने आपले पैसे परत मिळवण्यासाठी आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. कानपूर पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध एफआयआर नोंदवून शोध सुरू केला आहे. त्यांना पकडण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात येत आहे. कानपूरच्या गोविंदनगर भागात एक थेरपी सेंटर उघडण्यात आलं होतं, ज्यामध्ये वृद्धांना तरुण करण्यासाठी थेरपी दिली जाते असा प्रचार करण्यात आला. हे मशीन इस्रायलमधून मागवण्यात आल्याचं सांगितलं.
मशीनच्या माध्यमातून ६० वर्षांच्या माणसाचं रूपांतर २५ वर्षांच्या तरुण मुलासारखं करण्यात येईल असं सांगण्यात येत होतं. रिव्हायव्हल वर्ल्ड नावाचे सेंटर उघडण्यात आले असून त्यात वृद्धांना नवसंजीवनी देणार असं सांगणारे पती-पत्नी हे या फसवणुकीचे मुख्य सूत्रधार होते. त्यांनी अनेक लोकांना फसवलं. खराब आणि प्रदूषित हवेमुळे लोक लवकर वृद्ध होतात. ऑक्सिजन थेरपी काही महिन्यांत त्यांना तरुण बनवते असं सांगितलं.
फसवणूक करणारे पती-पत्नी एका राऊंडच्या थेरपीसाठी सहा हजार रुपये घ्यायचे. त्यांनी भन्नाट फायदे सांगून लोकांना आपल्याकडे आकर्षित केलं होतं. एक चेन सिस्टम तयार केली होती, ज्यामध्ये त्यांनी अधिक लोकांना जोडल्यास विनामूल्य उपचार देण्याची स्कीम देखील दिली. त्यांच्या जाळ्यात शहरातील मोठे लोक अडकले. ज्यांना त्यांनी नंतर कोट्यवधींचा गंडा घातला. पोलीस या दोघांच्या शोध घेत असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.