होळीनिमित्त कॅशबॅक ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, सरकारकडून अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 01:16 PM2022-03-17T13:16:00+5:302022-03-17T13:16:32+5:30
Cyber Crime : सध्या फसवणूक करणारे लोक अशा आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारची रोकड देण्याचे आमिष दाखवून लिंक पाठवतात.
नवी दिल्ली : सध्याच्या काळात बँकेशी संबंधित कामे आणि व्यवहार खूप सोपे झाले आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसून करू शकता. मात्र सध्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अनेक घोटाळेबाज कॅशबॅकच्या नावाखाली फसवणूक करतात, त्याबाबत सरकारने अलर्ट जारी केला आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सायबर दोस्त या ट्विटर हँडलने याबाबत अनेक ट्विट केले आहेत.
"आनंदी आणि सायबर सुरक्षित 'होळी' सण साजरा करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनव्हेरिफाइड पोस्ट किंवा न्यूज शेअर किंवा फॉरवर्ड करू नका. सावध राहा आणि सायबर सुरक्षित राहा", असे सायबर दोस्तने ट्विट करत म्हटले आहे. तसेच, आणखी एका ट्विटमध्ये सायबर दोस्तने म्हटले आहे की, 'यूपीआय अॅपद्वारे पेमेंट करण्याची ऑफर देणाऱ्या डिस्काउंट कूपन, कॅशबॅक आणि फेस्टिव्हल कूपनशी संबंधित सोशल मीडियावरील विविध फसव्या आकर्षक जाहिरातींपासून सावध राहा. सावध राहा आणि सायबर सुरक्षित राहा."
Have a happy and cybersafe "Holi" festival. Don't share or forward unverified posts/news on social media platform. Beware and be cybersafe. pic.twitter.com/MsqOmsp9QS
— Cyber Dost (@Cyberdost) March 16, 2022
दरम्यान, सध्या फसवणूक करणारे लोक अशा आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारची रोकड देण्याचे आमिष दाखवून लिंक पाठवतात. या लिंकद्वारे, ते तुम्हाला लॉटरी किंवा कॅशबॅक पाठवण्यासाठी तुमचा पिन विचारतात. तुम्ही या लिंकवर पिन टाकताच ते तुमच्या खात्यातील सर्व पैसे काढून घेतात. अशा परिस्थितीत, अशी कोणतीही लिंक उघडू नका आणि ती लवकरात लवकर डिलीट करा.
तुमचे बँकिंग डिटेल्स शेअर करू नका
अनेक वेळा सायबर गुन्हेगार तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्सच्या नावाने कॉल करतात. यानंतर, ते तुमच्याकडून तुमचे बँकिंग डिटेल्स, यूपीआय पिन इत्यादी माहिती घेतात. त्यानंतर ते तुमचे खाते रिकामे करतात. अशा परिस्थितीत, तुम्ही अशा कोणत्याही कॉलच्या फंदात पडू नका आणि कोणत्याही स्थितीत तुमचे बँकिंग डिटेल्स शेअर करू नका.
बँकिंग फसवणुकीशी संबंधित प्रकरणे
सरकारी आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात देशात इंटरनेट बँकिंग फसवणुकीशी संबंधित 69818 प्रकरणे नोंदवली गेली. याशिवाय, याआधी 2019-20 या आर्थिक वर्षात 73552 फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली होती. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या या आकडेवारीत यूपीआय, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित बाबींचाही समावेश आहे.