IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 03:08 PM2024-11-21T15:08:42+5:302024-11-21T15:09:00+5:30
एका महिलेने आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याचं खोटं सांगून किटी पार्टी ग्रुप तयार केला आणि तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लखनौमध्ये एका महिलेने आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याचं खोटं सांगून किटी पार्टी ग्रुप तयार केला आणि तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.
२४ मार्च रोजी फसवणूक करणाऱ्या रश्मी या महिलेने स्वतः चार महिलांविरोधात पोलीस चौकीत तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण उघङकीस आलं. महिलांनी तिच्या घरातून ब्लँक चेक चोरला असून त्याचा गैरवापर होत असल्याचं तिने सांगितले. पोलिसांनी जेव्हा या महिलांना बोलावलं तेव्हा भलतीच गोष्ट समोर आली. घरातून ब्लँक चेक चोरीला गेल्याचं रश्मी सिद्ध करू शकली नाही.
महिलांनी डीसीपींची भेट घेतली आणि रश्मी सिंह विरोधात एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, त्या १३ वर्षांपूर्वी रश्मीला एका मैत्रिणीमार्फत एका पार्टीत भेटल्या होत्या. यानंतर पैशांचा व्यवहार सुरू झाला. या बहाण्याने तिने १८ लाख रुपये घेतले, तिच्यावर दबाव टाकल्यावर तिने ५ लाख रुपये परत केले आणि १३ लाख रुपये मागितले असता तिने या महिलांनाच अडकवण्याची धमकी दिली आहे.
लखनौची रहिवासी असलेल्या रश्मी सिंहचं इंदिरा नगरच्या बाल विहार कॉलनीत एक आलिशान घर आहे, ज्यात चारही बाजूंनी सीसीटीव्ही बसवले आहेत. चार-पाच आलिशान गाड्या आहेत. रश्मी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. ती आपल्या लाईफस्टाईलने लोकांमध्ये आपली छाप पाडते आणि व्यावसायिकांच्या पत्नींना टार्गेट करून ती आपल्या जाळ्यात अडकवते. हळूहळू ती महिलांशी मैत्री करते आणि त्यांच्या घरी पार्टी करते.
सर्व महिलांना आमिष दाखवून तिने किटी पार्टीद्वारे पैसे गुंतवले. यासोबतच म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यासाठी चांगल्या नफ्याचे आमिषही दाखवलं. १० महिला एका किटी पार्टीमध्ये भेटल्या ज्यामध्ये त्यांनी आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं. १० जणींकडून १.५ कोटी रुपये उकळल्याचं उघड झालं आहे.
हरजीत कौरने सांगितलं की, रश्मीने म्युच्युअल फंड आणि मालमत्तेची कागदपत्रं घेतली होती. आजारपणाच्या बहाण्याने ती लाखो रुपये घेऊन इतरांची फसवणूक करत आहे. प्रत्येकाकडून रोख रक्कम घेते आणि ऑनलाइन पैसे घेत नाही. अनामिका हिने सांगितले की, तिला म्युच्युअल फंडात जास्त नफा देण्याचे आमिष दाखवण्यात आलं. तिने पैसे परत मागितले असता आत्महत्या करून सर्वांना अडकवणार असल्याचं सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.