परफॉर्मन्स फंडच्या नावाखाली निवृत्त कंपनी संचालकाची फसवणूक, ताडदेवमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:35 AM2018-11-20T01:35:03+5:302018-11-20T01:35:17+5:30
आयकर विभागाच्या परफॉर्मन्स फंडच्या नावाखाली ८५ वर्षीय निवृत्त कंपनी संचालकाची फसवणूक केल्याचा प्रकार ताडदेवमध्ये उघडकीस आला आहे. हरियाणा, दिल्लीतील तोतया आयकर अधिकारी महिलेने त्यांची ७५ हजार रुपयांना फसवणूक केली.
मुंबई : आयकर विभागाच्या परफॉर्मन्स फंडच्या नावाखाली ८५ वर्षीय निवृत्त कंपनी संचालकाची फसवणूक केल्याचा प्रकार ताडदेवमध्ये उघडकीस आला आहे. हरियाणा, दिल्लीतील तोतया आयकर अधिकारी महिलेने त्यांची ७५ हजार रुपयांना फसवणूक केली. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ताडदेव परिसरात ८५ वर्षीय वसंतलाल नगरदास संघवी हे पत्नी आणि मुलीसोबत राहतात. त्यांची ‘संघवी अॅण्ड कंपनी’ होती. निवृत्तीनंतर २० वर्षांपूर्वी त्यांनी कंपनी बंद केली. त्यातून येणारा पैसा बँकेत फिक्स डिपॉझिट केला. त्या व्याजदरावर त्यांचा उदरनिर्वाह होत असे.
शुक्रवार, १६ जुलैला सकाळी ११ वाजता त्यांच्या मोबाइलवर स्वाती सिंग नावाच्या महिलेने कॉल करून आयकर विभागातून बोलत असल्याचे सांगितले. कंपनीचा १५ वर्षांपूवीचा परफॉर्मन्स फंड १ लाख ६५ हजार ८५० रुपये जमा असल्याचे सांगितले. तो हवा असल्यास १७ हजार ३७० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, शनिवारी, १७ जुलैला त्यांनी आर.टी.जी.एस.द्वारे पैसे भरले. पुढे २० दिवसांत तुमचे पैसे खात्यात जमा होतील, असे तिने सांगितले. त्यानंतर लगेचच सिंग नावाच्या महिलेने १३ आॅगस्टला पुन्हा त्यांना कॉल करून खात्यात ५ लाख ५६ हजार ५०० रुपये जमा असल्याचे सांगितले. ते परत मिळविण्यासाठी ५८ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी पुन्हा महिलेवर विश्वास ठेवून पैसे भरले. पुढे आणखी एक लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. पुढे पैसे खात्यात जमा होतात का, याची वाट पाहिली. मात्र पैसे जमा झाले नाहीत. अखेर शनिवारी त्यांनी पोलीस तक्रार केली.
तो कॉल हरियाणातून
संघवी यांना आलेला फोन हा हरियाणातून आला आहे. मोबाइल क्रमांकाद्वारे अधिक तपास सुरू असल्याची माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी दिली.
पैसे दिल्लीच्या खात्यात
संघवी यांनी जमा केलेली रक्कम ही दिल्लीतील बँक खात्यात जमा झाली आहे. त्या बँक खात्यांच्या आधारेही आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.