दामदुप्पट योजनेद्वारे फसवणूक : इंदापुरात पती-पत्नीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 06:35 PM2019-03-14T18:35:16+5:302019-03-14T18:36:28+5:30
आमच्याकडे पैसे गुंतवल्यास पाच वर्षांत तुमचे पैसे दामदुप्पट करून देऊ, असे सांगणाऱ्या पती-पत्नींवर इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आम्ही विमा पीएसीएल कंपनीचे एजंट आहोत. आमच्याकडे पैसे गुंतवल्यास पाच वर्षांत तुमचे पैसे दामदुप्पट करून देऊ, असे सांगणाऱ्या पती-पत्नींवर इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळासाहेब नामदेव गायकवाड (रा. आंबेडकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील एका आश्रमशाळेत सहशिक्षकाची नोकरी करणारे तानाजी अण्णा चंदनशिवे व त्यांची पत्नी ललिता तानाजी चंदनशिवे (रा. वडापुरी, ता. इंदापूर)अशी गुन्हा दाखल झालेल्यांंची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : इंदापूरमधील भीमाई आश्रमशाळा (इंदापूर) येथे कामाठी म्हणून काम करणारे बाळासाहेब गायकवाड यांना त्या शाळेतील सहशिक्षक तानाजी अण्णा चंदनशिवे यांनी सांगितले, की मी व माझी पत्नी ललिता पीएसीएल विमा कंपनीचे एजंट म्हणून काम करतो. त्यात तुम्ही गुंतवणूक केली तर ५ वर्षांमध्ये रक्कम दामदुप्पट होईल. सुरुवातीला गायकवाड यांनी गुंतवणूक करण्यास नकार दिला. मात्र, चंदनशिवे यांनी सातत्याने पाठपुरवा करून त्यांच्याकडून ३ ऑक्टोबर २०१० पासून दरमहा ५५० रुपयांची गुंतवणूक करून घेतली. यासाठी यू १५१३१९३३६ असा खाते क्रमांक दिला. त्यानंतर २७/७/२०१४ रोजी एकूण ४० हप्त्यांचे २२ हजार रुपये तानाजी चंदनशिवे यांच्याकडे जमा झाले. त्यानंतर चंदनशिवे हप्ता न्यायला आलेच नाहीत. त्यामुळे गायकवाड यांनी चौकशी केल्यावर चंदनशिवेंनी सांगितले, की पीएसीएल कंपनीची कोर्टात केस चालू आहे; त्यामुळे सध्या व्यवहार बंद आहेत. केस संपताच पैसे मिळतील. त्यानंतरही सातत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अखेर मार्चमध्ये गायकवाड यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यामुळे चंदनशिवे पती-पत्नींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे पुढील तपास करीत आहेत.