आर्थिक अडचणींची थाप मारून महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:21 AM2021-10-13T11:21:10+5:302021-10-13T11:21:30+5:30
Crime News: आर्थिक अडचण असल्याची थाप मारून वस्तू खरेदी करायच्या असे सांगत दलालाने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार २०१८ पासून ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू होता.
औरंगाबाद : आर्थिक अडचण असल्याची थाप मारून वस्तू खरेदी करायच्या असे सांगत दलालाने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार २०१८ पासून ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू होता. हामेद अली खान रफत खान (रा. राहत कॉलनी, पं. स. कार्यालयामागे) असे फसवणूक करणाऱ्या दलालाचे नाव आहे.
शहाबाजारातील ३१ वर्षीय महिलेची २०१८ मध्ये नातेवाइकांच्या एका कर्ज प्रकरणादरम्यान दलाल हामेद अली याच्याशी ओळख झाली. त्यानंतर हामेदने याने आपले सिव्हिल खराब आहे. त्यामुळे तुमच्या नावे कर्ज प्रकरण करू अशी महिलेला गळ घातली. त्यावेळी आर्थिक अडचण असल्याचे सांगत त्याने महिलेच्या नावे एका फायनान्स कंपनीतून १ लाख ७१ हजारांचे पहिले कर्ज उचलले. या कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर त्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या आहेत, असे सांगत महिलेच्या नावे दुसऱ्या बँकेतून पुन्हा १ लाख २४ हजारांचे कर्ज उचलले. अशाच पद्धतीने महिलेला आर्थिक अडचण असल्याचे सांगत तो वेगवेगळ्या फायनान्स कंपनी आणि बँकेतून महिलेच्या नावे कर्ज उचलायचा. काही महिने हप्त्यांची परतफेड केल्यानंतर अचानक त्याने हप्ते थकवले. हप्ते थकल्यामुळे बँक व फायनान्स कंपनीने महिलेकडे पैसे भरण्यासाठी तगादा सुरू केला. तेव्हा आपले सिव्हिल खराब होत असल्यामुळे हप्त्यांची परतफेड करा, असे महिलेने हामेद अलीला सांगितले. मात्र, हामेद अलीने हप्ते भरण्यास टाळाटाळ केली.
३ लाख ५५,५०० रुपयांचे हप्ते थकवले
आरोपीने एकंदरीत फायनान्स कंपनी आणि बँक यांचे ३ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे हप्ते थकवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरून महिलेने अखेर सिटीचौक पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक सुभाष हिवराळे करत आहेत.