लग्नाच्या बहाण्याने तरुणींची फसवणूक; लैंगिक शोषणासाठी मॅट्रिमोनियल साइटचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 00:28 IST2020-07-01T00:27:39+5:302020-07-01T00:28:00+5:30
सचिन उच्चशिक्षित व विवाहित आहे. मॅट्रिमोनियल साइटवर तो घटस्फोटित असल्याचे दाखविले. शिवाय स्वत:चा पगार लाखाच्या घरात असल्याचे दाखवल्याने, त्याच्याशी लग्न करण्यास इच्छुक असणाऱ्यांचे प्रतिसाद यायचे

लग्नाच्या बहाण्याने तरुणींची फसवणूक; लैंगिक शोषणासाठी मॅट्रिमोनियल साइटचा वापर
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना, तसेच घटस्फोटीत महिलांना जाळ्यात ओढून फसवणूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साइटवर स्वत:ची नोंदणी करून, तो लग्नास इच्छुक असणाºया तरुणींशी संपर्क साधायचा. त्याच्या अटकेनंतर त्याने २५ हून अधिक महिला व मुलींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची तक्रार एका वकील महिलेने रबाळे पोलिसांकडे केली होती. त्यावरून रबाळे पोलीस तपास करत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर यांना संशयित तरुणाची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पालघरच्या दहरेंजा गावात सापळा रचला होता. यावेळी निंबाळकर यांच्या पथकाने दहरेंजा येथून सचिन पाटील उर्फ सचिन सांबरे याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक केली असता, चौकशीत अधिक धक्कादायक माहिती समोर आली. सचिनने मागील वर्षभरात २५ हून अधिक महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. त्यापैकी १५ हून अधिक तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. केवळ वासनेतूनच तो त्याने मुलींना फसवल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार, रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.
अशी करायचा फसवणूक : सचिन उच्चशिक्षित व विवाहित आहे. मॅट्रिमोनियल साइटवर तो घटस्फोटित असल्याचे दाखविले. शिवाय स्वत:चा पगार लाखाच्या घरात असल्याचे दाखवल्याने, त्याच्याशी लग्न करण्यास इच्छुक असणाऱ्यांचे प्रतिसाद यायचे. त्यापैकी एखादी तरुण मुलगी किंवा घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गाठीभेटी वाढवायचा, तसेच भेटीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्यानंतर संपर्क तोडायचा. अशाच प्रकारे त्याने नवी मुंबईसह ठाणे व मुंबई परिसरातील महिलांचे लैंगिक शोषण केल्याची शक्यता आहे.