धनादेश अनादरीत; यवतमाळच्या व्यापाऱ्यास सहा महिन्यांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 10:48 AM2021-06-05T10:48:02+5:302021-06-05T10:48:12+5:30
Checks dishonour Case : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यु. पी. हिंगमिरे यांच्या न्यायालयाने आरोपीस शुक्रवारी सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला : यवतमाळ येथील एका व्यापार्याने अकोल्यातील कोठडी बाजारात असलेल्या जीएन एंटरप्राइजेस येथून मीठ खरेदी केल्यानंतर, त्या मोबदल्यात दिलेला धनादेश अनादरीत झाल्यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यु. पी. हिंगमिरे यांच्या न्यायालयाने आरोपीस शुक्रवारी सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन लाख ७० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
अकोल्यातील रहिवासी मोहम्मद हनिफ मोहम्मद इब्राहिम ऊर्फ हमीद भाई यांचे जीएन नावाने मीठ विक्रीचे होलसेल दुकान असून या दुकानातून यवतमाळ येथील रहिवासी मोहम्मद फिरोज मोहम्मद सिराज कोठी याने मिठाची खरेदी केली होती. या मिठाचे पैसे देण्याच्या मोबदल्यात त्याने मोहम्मद हनीफ यांना धनादेश दिला होता. पण बरेच दिवस रक्कम मिळत नसल्याने मोहम्मद हनिफ मोहम्मद इब्राहिम यांनी तो धनादेश बँकेत वठविण्यासाठी दिला असता, तो अनादरीत झाला. त्यामुळे व्यापारी मोहम्मद हनिफ त्यांनी ॲड. पियुष सांगानी यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला. या खटल्याची सुनावणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यु. पी. हिंगमिरे यांच्या न्यायालयात सुरू झाली असता, आरोपी मोहम्मद फिरोज मोहम्मद सिराज कोठी हा मिठाचे पैसे देत नसल्याचे समोर आले. तसेच अशाच प्रकारे काही व्यापाऱ्यांना त्याने गंडविल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयाने आरोपी मोहम्मद फिरोज मोहम्मद सिराज कोठी याला धनादेश अनादर प्रकरणात सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ७० हजार रुपये दंडही ठोठावला, तर दुसर्या प्रकरणात तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी फिर्यादी हमीदभाई यांच्यावतीने ॲड. पियुष सांगानी यांनी कामकाज पाहिले.