सोनं तस्कीरीचा 'स्मार्ट' प्रयत्न, मोबाईल पाहून पोलिसही झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 09:48 PM2021-10-21T21:48:04+5:302021-10-21T21:49:18+5:30
Gold Smuggling : तस्करांनी चेन्नईमध्ये अशीच एक युक्तीने सोनं तस्करी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आणि ते पकडले गेले.
चेन्नई - सोने तस्कर कधीकधी देशात बेकायदेशीरपणे सोनं आणण्यासाठी अशा पद्धती वापरतात की देखरेख करणाऱ्या यंत्रणाही चक्रावून जातात. तस्करांनी चेन्नईमध्ये अशीच एक युक्तीने सोनंतस्करी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आणि ते पकडले गेले.
तस्करांच्या येण्याची टीप होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई विमानतळावर तैनात एअर कस्टम अधिकाऱ्यांना विमानातून बेकायदेशीरपणे सोने आणण्याबाबत गुप्त सूचना मिळाली होती. या टीपनुसार कारवाई करत अधिकाऱ्यांनी बुधवारी संध्याकाळी दुबईहून चेन्नईला पोहोचलेल्या विमानाच्या प्रवाशांची झडती घेतली. तपासात लोकांकडून काहीही सापडले नाही. यानंतर, जेव्हा त्यांच्यासोबत असलेले लॅपटॉप आणि मोबाईल फोनची तपासणी केली गेली, तेव्हा अधिकारी त्यांच्या आत असलेले दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले.
सोने वितळवून बनवलेला थर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्करांनी सोने वितळवून कागदी पातळ थराप्रमाणे बनवले होते. यानंतर, लॅपटॉपमधील कीबोर्डच्या आत तो थर ठेवण्यात आला होता. यानंतर, कीबोर्ड पुन्हा जोडून लॅपटॉप सुरू झाला. त्याचप्रमाणे तस्करांनी त्यांच्याकडे असलेले मोबाईल फोन उघडून त्यांच्या आत सोन्याचा थर लपवला होता. तपासानंतर अधिकाऱ्यांनी सर्व वस्तू जप्त केल्या.
दोन कोटी रुपयांचे सोने जप्त
एअर कस्टम्स (चेन्नई एअर कस्टम्स) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्करांकडून सुमारे २४ कॅरेट दर्जाचे सुमारे ५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत सुमारे २ कोटी १९ लाख रुपये आहे. यासह, कोणतीही माहिती न देता गुप्तपणे देशात आणलेली सुमारे ४८ लाख रुपयांची इलेक्ट्रॉनिक गॅझेट देखील जप्त करण्यात आली. या प्रकरणी ५ तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे कनेक्शन शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू आहे.