लग्नाला जमली इतकी गर्दी की वधू-वराला भरावा लागला तब्बल ९ लाख ५० हजारांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 04:55 PM2021-07-07T16:55:32+5:302021-07-07T16:57:28+5:30
छत्तीसगढच्या अम्बिकापूर शहरात एका लग्न सोहळ्याला १ हजाराहून अधिक जणांनी उपस्थिती लावून कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
छत्तीसगढच्या अम्बिकापूर शहरात एका लग्न सोहळ्याला १ हजाराहून अधिक जणांनी उपस्थिती लावून कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजीव कुमार यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनानं लग्न समारंभाचे आयोजक आणि वध-वर पक्षावर कारवाई केली असून कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याविरोधातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
जिल्हा प्रशासनानं लग्न समारंभाचं सभागृह सील करण्यासोबतच सभागृहाचे संचालक आणि वधू-वर पक्षावर एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अम्बिकापूर येथील चौरसिया मॅरेज गार्डन येथे २ जुलै रोजी एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला १ हजाराहून अधिक जण उपस्थित होते अशी माहिती संजीव कुमार यांना मिळाली. त्यानुसार संजीव कुमार यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीअंती लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता विवाह सोहळ्यासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीची परवानगी असतानाही तब्बल १ हजार माणसांना निमंत्रित केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. चौरसिया मॅरेज गार्डनचे संचालक विरेंद्र चौरसिया यांना ४ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
यासोबतच विवाह सोहळ्यातील वराचे वडील सरोज साहू यांना २ लाख ३७ हजार रुपयांचा, तर वधूचे वडील प्रकाश साहू यांनाही २ लाख ३७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गत विवाह सोहळ्यांवरही आता प्रशासनानं करडी नजर ठेवण्या सुरुवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत असतानाच नागरिकांमध्ये बेजबाबदारपणा वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. बाजारासह सार्वजनिक ठिकाणी लोक मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं अशाप्रकारे नियमांचं उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे.