यूट्यूबवर पाहून बनवला बॉम्ब अन् पत्नीच्या बॉसची उडवली कार; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:24 IST2025-01-31T09:26:22+5:302025-01-31T10:24:48+5:30
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.

यूट्यूबवर पाहून बनवला बॉम्ब अन् पत्नीच्या बॉसची उडवली कार; आरोपीला अटक
छत्तीसगडमधील दुर्ग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या बॉसची कार बॉम्बने उडवून दिली. पत्नीचे तिच्या बॉससोबत अफेअर सुरु आहे, असा संशय आरोपी व्यक्तीला होता. त्यामुळे त्याने रिमोट कंट्रोल बॉम्ब बनवला आणि पत्नीच्या बॉसची कार उडवून दिली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितानुसार, दुर्ग पोलिसांनी देवेंद्र सिंग (४०) नावाच्या आरोपीला अटक केली. देवेंद्रने त्याच्या पत्नीच्या बॉसची कार रिमोट कंट्रोल बॉम्बने उडवून दिली. सुदैवाने, बॉम्बस्फोटावेळी कारमध्ये कोणीही नव्हते. जर कारमध्ये कोणी असते, तर मोठी दुर्घटना घडली असती. पोलिस चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की त्याने यूट्यूबवर पाहून बॉम्ब बनवला होता.
या प्रकरणाची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भिलाई शहरातील रिअल इस्टेट व्यावसायिक संजय बुंदेला यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये अचानक स्फोट झाला. पोलिसांनी या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावेळी एका आरोपीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
आरोपी देवेंद्रने सांगितले की, त्याला संशय होता की त्याची पत्नी आणि बॉस संजय बुंदेला यांचे अफेअर सुरु आहे. त्यामळे त्याने रिमोट कंट्रोल बॉम्बने कार उडवून दिली. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरुद्ध नवीन फौजदारी कायदा बीएनएस आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.