भावाला राखी बांधून परतणाऱ्या दोन बहिणींवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी काढली आरोपींची धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 03:42 PM2023-09-03T15:42:57+5:302023-09-03T15:43:18+5:30
होणाऱ्या नवऱ्याला बेदम मारहाण, त्याच्यासमोरच आठ आरोपींचा तरुणींवर सामूहिक अत्याचार.
रायपूर: काही दिवसांपूर्वीच देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये याच दिवशी मानवतेला लाजवाणारी घटना घडली. रक्षाबंधनाच्या दिवशी(30 ऑगस्ट) दहा आरोपींनी दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर हे कृत्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी आपल्या भावाला राखी बांधून महासमुंद येथून परतत होत्या. आरोपींनी त्यांचा विनयभंग केला, नंतर काही अंतरावर जाऊन सामूहिक बलात्कार केला. मुलींसोबत आलेल्या तरुणालाही त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना न्यायालयात हजर केले, सध्या त्यांची 15 दिवसांसाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी आरोपींची न्यायालयापासून कारागृहापर्यंत धिंड काढली.
सविस्तर माहिती अशी की, मंदिर हसौद पोलिस स्टेशन हद्दीतील RIMS कॉलेजजवळ 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणींनी मंदिर हसौद पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोघी बहिणी आणि एकीचा होणारा पती, स्कूटीवरून भानसोजमार्गे रायपूरला परतत होते. यावेळी दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांनी त्यांना अडवले आणि धमकावून त्यांचे मोबाईल फोन आणि पैसे चोरले. काही वेळाने मागून चार दुचाकीवरुन आणखी मुले आली आणि तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच, दोघा बहिणींवर सामूहिक अत्याचार केला.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीरज चंद्राकर, चंचल तिवारी, डीएसपी अविनाश मिश्रा, दिनेश सिन्हा, ललिता मेहर आणि सहा पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर आरोपींना अटक करण्याच्या सूचनाही दिल्या. यानंतर त्यांनी स्वत: मंदिर हसौद पोलीस ठाणे गाठले. त्यांनी स्वत: पीडित मुलींकडून घटनेची माहिती घेतली. आरोपी अज्ञात होते, त्यामुळे पोलिसांना पीडितेकडून आरोपीचे रेखाचित्र मिळाले. या रेखाचित्राच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
चोवीस तासात आरोपी जेरबंद
या घटनेनंतर पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणांहून 24 तासांत 8 आरोपींना ताब्यात घेतले. पूनम ठाकूर, घनश्याम निषाद, लव तिवारी, नयन साहू, केवल वर्मा उर्फ सोनू, देवचरण धिवार, लक्ष्मी ध्रुव, प्रल्हाद साहू, कृष्णा साहू, युगल किशोर अशी आरोपींची नावे आहेत. यातील 5 आरोपी पिप्रहट्टा गावातील आहेत. उर्वरित आरोपी बोरा, उमरिया आणि टेकरी गावातील आहेत. यातील अनेकांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.