छोटा राजनला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा; जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 08:05 AM2024-05-31T08:05:40+5:302024-05-31T08:06:14+5:30
२०१५ मध्ये छोटा राजनला बालीहून भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर नोंदविण्यात आलेले ७१ गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयानेछोटा राजनला गुरुवारी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २३ वर्षांपूर्वी जया यांची हत्या करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार जे. डे. यांची हत्या केल्याप्रकरणी छोटा राजनला या आधी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
२०१५ मध्ये छोटा राजनला बालीहून भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर नोंदविण्यात आलेले ७१ गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. त्यापैकी एक जया शेट्टीची हत्येचे एक प्रकरण आहे. विशेष न्यायालयाचे न्या. ए. एम. पाटील यांनी छोटा राजनला जया यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. बालीमधून भारतात आणण्यात आल्यापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. मुंबईला आपल्या जीवाला धोका आहे, असे म्हणत त्याने मुंबईत येण्यास नकार दिला.
काय आहे प्रकरण?
- मध्य मुंबईत असलेले गोल्डन क्राऊन हॉटेलचा मालक जया शेट्टी होता. त्याला खंडणीसाठी छोटा राजनच्या गँगचे धमकीचे फोन येत होते.
- दि. ४ मे २००१ या दिवशी छोटा राजनच्या गँगमधील दोन माणसे थेट त्यांच्या हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी शेट्टीची हत्या केली. शेट्टीच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरविली होती. त्याच्या हत्येचा दोनच महिन्यांपूर्वी त्याचे संरक्षण काढण्यात आले होते.