Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 21:55 IST2021-07-29T21:54:36+5:302021-07-29T21:55:06+5:30
Underworld don Chhota Rajan : छोटा राजनच्या पोटात तीव्र वेदना आणि इतर काही समस्या आढळल्यामुळे छोटा राजनला एम्समध्ये दाखल करावे लागले.

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल
नवी दिल्ली - तिहार कारागृहात बंद असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची प्रकृती अचानक खालावली. त्याला एम्स रुग्णालयात दाखल करावे लागले. छोटा राजनच्या पोटात तीव्र वेदना आणि इतर काही समस्या आढळल्यामुळे छोटा राजनला एम्समध्ये दाखल करावे लागले.
तिहार कारागृह क्रमांक २ मध्ये बंद असलेल्या छोटा राजनच्या प्रकृती अस्वस्थाबाबत मंगळवारी दुपारी माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. जेव्हा अचानक त्याच्या पोटात तीव्र वेदनेबाबत सुरक्षारक्षकांना माहिती मिळताच जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याविषयी कळविण्यात आले. छोटा राजनशी बोलल्यानंतर डॉक्टरांना बोलविण्यात आले. सुरुवातीला तुरूंगातील डॉक्टरांनीच छोटा राजनची तपासणी केली. परंतु या तपासणीत काही निष्कर्ष न लागल्याने एम्स रुग्णालयात पाठवणे डॉक्टरांनी निवडले. यानंतर सुरक्षेच्या दरम्यान छोटा राजन याला मंगळवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले.
छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे. सोमवारी तिहारचे सहाय्यक तुरुंग अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयाला सांगितले की, एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे छोटा राजनला हजर केले जाऊ शकणार नाही. सध्या त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाचे दुष्परिणाम
हा पोस्ट-कोरोना प्रभाव असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सध्या केवळ डॉक्टरच याबद्दल सांगू शकतात. छोटा राजनला एका पूर्णपणे वेगळ्या वॉर्डात ठेवण्यात आले आहे. जिथे इतर कैदी किंवा तुरूंगातील प्रत्येक कर्मचारी जाऊ शकत नाही. सुरक्षेची कारणे लक्षात घेऊन छोटा राजन नेहमी सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली असतो. जेणेकरून कोणीही त्याला कोणत्याही प्रकारे इजा करु शकत नाही.