Chhota Rajan : ज्याच्या मृत्यूची पसरली होती अफवा; तो छोटा राजन कोरोनातून झाला ठणठणीत बरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:55 PM2021-05-11T19:55:27+5:302021-05-11T19:58:18+5:30
Chhota Rajan : ७ मेला दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आले व सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली होती.
कुविख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजे याचा ७ मेला दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आले व सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र त्याचे निधन झाले नसून तो जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा खुलासा एम्स रुग्णालयाने केला होता. गुन्हेगाराच्या उपचारांबाबत असा खुलासा रुग्णालयाला प्रथमच करावा लागला होता. त्यानंतर १६ दिवसांनी छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. आज राजनला एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
एकेकाळी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू साथीदार असलेला छोटा राजन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद टोळीतून फुटून बाहेर पडला होता. दुबईतून पलायन केल्यानंतर तो अनेक देशांत लपूनछपून वास्तव्यास होता. त्याही काळात तो मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होता. आपल्या हस्तकांमार्फत त्याने मुंबईत अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील अनेक आरोपींची हत्या करून त्याने आपण देशभक्त डॉन असल्याचा दावा केला होता.
Underworld don Chhota Rajan discharged from AIIMS after recovering from COVID19: AIIMS Officials
— ANI (@ANI) May 11, 2021
He was admitted to the hospital on 25th April.
(file pic) pic.twitter.com/SWcGh9VmE0
२५ आक्टोबर २०१५ रोजी इंडोनेशियात बाली येथे मोहन कुमार नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे प्रवास करत असताना पकडला गेला. तो फरारी असल्याबाबत भारत सरकारने आधीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. संशय आल्यानंतर छोटा राजनच्या बोटांचे ठसे तपासले असता त्याची ओळख पटली. त्याच्या अटकेचे वृत्त समजल्यानंतर त्याला ताब्यात देण्याविषयी भारत सरकारकडून इंटरपोलशी संपर्क साधण्यात आला. छोटा राजनचे भारतात प्रत्यार्पण केल्यापासून तो दिल्लीच्या तिहारच्या कारागृहात आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे २५ एप्रिल रोजी त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आज कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.