जे. डे. हत्याकांड प्रकरणात शिक्षा भोगत असलेला छोटा राजनचा साथीदार अनिल वाघमोडेला पॅरोल मंजूर  

By पूनम अपराज | Published: February 10, 2021 04:39 PM2021-02-10T16:39:17+5:302021-02-10T16:40:42+5:30

J. Dey Murder Case : छोटा राजनसह या हत्याकांडातील इतर नऊ दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Chhota Rajan's accomplice Anil Waghmode, who is serving his sentence in the J Dey murder case, has been granted parole | जे. डे. हत्याकांड प्रकरणात शिक्षा भोगत असलेला छोटा राजनचा साथीदार अनिल वाघमोडेला पॅरोल मंजूर  

जे. डे. हत्याकांड प्रकरणात शिक्षा भोगत असलेला छोटा राजनचा साथीदार अनिल वाघमोडेला पॅरोल मंजूर  

Next
ठळक मुद्देअनिल भानुदास वाघमोडे याने मोटारसायकलची सोय केली होती. कटाला अंतिम स्वरूप देताना त्याच्याच कॉलिसचा वापर करण्यात आला होती. सध्या वाघमोडे नागपूर जेलमध्ये असून पत्नीच्या आजारपणामुळे त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे.

नागपूर :  बहुचर्चित जे. डे हत्याकांड प्रकरणातील कैदी व छोटा राजनचा साथीदार अनिल भानुदास वाघमोडेला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. सध्या वाघमोडे नागपूर जेलमध्ये असून पत्नीच्या आजारपणामुळे त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोट यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 

 जे. डे हत्याकांड प्रकरणी अंडरवर्ल्ड गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनला विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. छोटा राजनसह या हत्याकांडातील इतर नऊ दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोदिया अशी जन्मठेप ठोठावण्यात आलेल्या इतर ८ दोषींची नावे आहेत.

या हत्याकांडप्रकरणी पॉल्सन जोसेफ आणि पत्रकार जिग्ना वोरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. जे. डे हे एका इंग्रजी सायंदैनिकाचे संपादक होते. तर जिग्ना वोरा ही एका इंग्रजी दैनिकात वरिष्ठ पदावर होती. पत्रकारितेतील स्पर्धेतून जिग्नाने जे. डे यांना संपवण्यासाठी छोटा राजनला चिथावले, असा आरोप करण्यात आला होता, मात्र हा आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही, त्यामुळे न्यायालयाने जिग्नाची निर्दोष मुक्तता केली. पॉल्सन जोसेफ यांचीही न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. तर सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले होते.

शिक्षा सुनावली जात होती तेव्हा छोटा राजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित होता. या खटल्यात एकूण १३ जणांवर आरोप करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे. दरम्यान, छोटा राजनसह नऊ आरोपींवरील शिक्षेबाबत न्यायालयात युक्तिवाद केला गेला होता. त्यानंतर विशेष मोक्का न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली होती.

अनिल वाघमोडेचा या हत्याकांडात असा होता सहभाग 

अनिल भानुदास वाघमोडे याने मोटारसायकलची सोय केली होती. कटाला अंतिम स्वरूप देताना त्याच्याच कॉलिसचा वापर करण्यात आला होती. रिव्हॉल्वर मिळविण्यासाठी वाघमोडे सतीश काल्याबरोबर नैनितालला गेला होता. डे यांची ओळख पटवून घेण्यासाठी तो ७ जून रोजी मुलुंडच्या उमा बारमध्ये गेला होता. डे यांच्या घरावर सतत नजर ठेवणाऱ्या गटात तो होता. ११ जून रोजी त्याने डे यांच्या बाइकचा पाठलाग केला होता. अटक होऊ नये, यासाठी तो अन्य आरोपींसह गुजरात, शिर्डी, सोलापूर, विजयपूर आणि अन्य ठिकाणी फिरत राहिला होता.

कधी घडले हे हत्याकांड 

जे. डे यांची त्यांच्या पवई येथील निवासस्थानाजवळ ११ जून २०११ रोजी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेले डे यांचा हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. मुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास करून डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून घडल्याचे स्पष्ट केले.

 

Web Title: Chhota Rajan's accomplice Anil Waghmode, who is serving his sentence in the J Dey murder case, has been granted parole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.