छोटा राजन टोळीच्या हस्तक खंडणी प्रकरणात ६ वर्ष होता फरार, पुण्यात केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:39 PM2021-02-03T15:39:37+5:302021-02-03T15:43:34+5:30
Gangster Chhota Rajan : याप्रकरणात छोटा राजनला झाली आहे शिक्षा
पुणे : पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकास २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गेल्या ६ वर्षापासून फरार असलेल्या छोट्या राजनच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कोंढव्यातून अटक केली आहे. परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. थ्री ज्वेल्स कोलते पाटील, टिळेकर नगर, कोंढवा) असे या छोटा राजनच्या हस्तकाचे नाव आहे.
पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदु वाझेकर व अदित्य दाढे यांची मार्केटयार्ड या भागात जमीन आहे. परमानंद ठक्कर यांने या जागेसंदर्भात बनावट कागदपत्रे तयार केली होती. तो प्रथम कुख्यात गुंड अश्विन नाईक याच्याकडे गेला होता. परंतु, त्याने मदत न केल्याने ठक्कर सुरेश शिंदे याच्याशी संपर्क साधला व नंदु वाझेकर यांना घेऊन चेंबुरला गेला होता. त्यावेळी सुरेश शिंदे व छोटा राजन यांचे फाेनवर बोलणे झाले. त्यावेळी छोटा राजन याने वाझेकर यांना २५ कोटी रुपये दे, सर्व प्रकरण मिटवतो. नाही तर तुला बघुन घेऊ, तुला खलास करुन, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी २०१५ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात छोटा राजन ऊर्फ राजन निकाळजे, त्याच्या टोळीतील सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमीत म्हात्रे यांना नवी मुंबई प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी २ वर्षे कैद व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यातील संशयित परमानंद ठक्कर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता.
शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखाचा ऐवज लुटला; तीन संशयित सीसीटीव्हीत कैद
गुन्हे शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना ठक्कर हा पुण्यात रहात असल्याचे समजले त्यावरुन त्यांनी सीबीआयच्या पुणे व मुंबई कार्यालयातून माहिती घेतली. त्यानंतर कोंढव्यातील उच्चभ्रु भागात राहणार्या ठक्कर याला मंगळवारी ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार योगेश जगताप, अजय थोरात, सचिन जाधव, महेश बामगुडे, आय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांनी केली.