भयंकर! मध्यरात्री निर्जन वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज; सर्व गावकरी बघायला गेले तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:49 PM2021-06-16T18:49:37+5:302021-06-16T19:25:05+5:30
मंगळवारी रात्री काही गावकरी या परिसरातून जात असताना त्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला.
कानपूर – यूपीच्या कानपूरमध्ये मंगळवारी मध्यरात्री गावाच्या बाहेर असणाऱ्या जुन्या वाड्यातून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. रस्त्यावरून येणाऱ्या काही गावकऱ्यांनी लहान मुलाचा आवाज ऐकला आणि गावात जाऊन त्यांनी इतरांना हे सांगितले. गावकऱ्यांनी हिंमत करत त्या निर्जन वाड्याजवळ गेले असता समोरील नजारा पाहून सगळेच चक्रावले.
एका लहान मुलाचा याठिकाणी बेदम मारहाण करून खांबाला बांधण्यात आलं होतं. हा मुलगा भीतीमुळे थरथर कापत होता आणि बेशुद्ध होण्याच्या स्थितीत होता. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत सूचना दिली असता ते घटनास्थळी पोहचले आणि त्या मुलाला मुक्त करून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कानपूरच्या फत्तेपूर गावातील ही अमानुष घटना समोर आली आहे.
याठिकाणी १२ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती. गावात राहणारा रामप्रकाश राठोडचा मुलगा रमन मंगळवारी जांभळं तोडण्यासाठी त्याचा मित्र किशोरसोबत गेला होता. रमन आणि किशोर यांनी दगडांनी जांभूळ तोडत होते. त्यावेळी रमनने फेकलेला दगड किशोरच्या डोक्यात लागला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला.
बदला घेण्याची दिली होती धमकी
या घटनेची माहिती मिळताच कमल किशोरचे वडील राजू यांनी तात्काळ त्याला दवाखान्यात डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर राजूने रमनच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ केली. इतकचं नाही तर तुझा बदला घेईन अशी धमकीही दिली. मंगळवारी रात्री राजूने रमनला पकडलं आणि त्याला शेताच्या रस्त्यावरून निर्जन वाड्यात नेले. राजूने रमनला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला खांबाला बांधून तिथून निघून गेला. दुसरीकडे रमनचे कुटुंब त्याचा शोध घेऊ लागलं.
गावकऱ्यांना ऐकला आवाज
मंगळवारी रात्री काही गावकरी या परिसरातून जात असताना त्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी गावकऱ्यांना याची माहिती देत सगळे जण त्या निर्जंन वाड्याजवळ गेले. तेव्हा लहान मुलाला बेदम मारहाण करून खांबाला बांधल्याचं दिसून आलं. हा मुलगा इतका घाबरला होता की, तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला तातडीने पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मुलगा खूप घाबरलेला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दोषीवर योग्य कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितले.