लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात पडून मुलाचा मृत्यू; डोंबिवलीतील दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:22 PM2022-01-19T12:22:47+5:302022-01-19T12:22:58+5:30
सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी एक मुलगा एक मुलगी अस त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी सायंकाळची घटना.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: इमारत बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात पडून सत्यम मौर्य या 10 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पुर्वेकडील सागाव परिसरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी एक मुलगा एक मुलगी अस त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांचा मुलगा सत्यम घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. अंधार पडला तरी सत्यम घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर त्याचा शोध घेतला परंतू त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यांच्या घराच्या बाजुलाच एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी त्यांनी जाऊन पाहीले असता इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात साचलेल्या पाण्यात सत्यमचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
सत्यमला पाण्याबाहेर काढून तत्काळ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेण्यात आले. परंतू तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून निष्काळजीपणा करणा-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.