हडपसरमध्ये १४ वर्षांच्या मुलीचा बालविवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 10:16 PM2019-12-07T22:16:37+5:302019-12-07T22:17:03+5:30
हे लग्न गुपचूप लावून देण्यात आल्याचे समोर
पुणे : बालविवाहाला बंदी असतानाही पिंपरी चिंचवड भागातील मद्यपी वडिल आणि आत्याने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़. मुलीच्या मावशीने हा प्रकार उघडकीस आणत हडपसरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. वडील, आत्या, भटजी व सांगली येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ वडिल व आत्याला पोलिसांनी अटक केली आहे़.
याप्रकरणी मावळ तालुक्यातील सोमाटणे येथील २४ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह तळेगाव परिसरात राहण्यास आहे. तिच्या वडिलांना दारुचे व्यसन आहे़ ते मिळेल कामधंदा करतात. दरम्यान, मुलीची आत्या हडपसर परिसरात राहण्यास आहे. वडील आणि आत्यांनी संगनमत करून सांगली येथील वयाने मोठा असणाऱ्या एका मुलाशी विवाह करून विवाह लावून दिला. त्यानंतर काही दिवसांनीच तिचे लग्न तिच्या वडील आणि आत्याने बळजबरीने लावून दिल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली.
त्यानंतर त्यांनी याची माहिती घेतली. त्यावेळी हे लग्न गुपचूप लावून देण्यात आल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी तळेगाव पोलीसांकडे तक्रार दिली. तळेगाव पोलिसांनी याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर यातील आरोपींवर गुन्हा दाखल करून हा प्रकार हडपसर भागात घडल्याने तपासासाठी हडपसर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.
या मुलीचे नातेवाईक हडपसर परिसरात राहण्यास आहेत. त्यामुळे या मुलीच्या लग्न कार्याची सुरूवात हडपसरमध्ये झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे हडपसर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. दरम्यान, आरोपी सांगलीत असल्याची माहिती मिळाल्याने हडपसर पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, वडिल आणि आत्याने केवळ वयाने १४ वर्षाच्या मुलीचे लग्न इतक्या घाईत का लावून दिले, याचा तपास पोलीस करत आहेत.