अपहरणकर्त्याला मिठी मारत चिमुकला जोरजोरात रडला; भावूक करणारा क्षण पाहून पोलीस गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:13 PM2024-08-30T14:13:21+5:302024-08-30T14:14:11+5:30
पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळेच अचंबित झाले. समोरील भावूक दृश्य पाहून पोलीस अधिकारी हैराण होते.
जयपूर - इरफान खान आणि जिमी शेरगिल यांचा बॉलिवूड सिनेमा 'मदारी'मध्ये गृहमंत्र्यांच्या एकुलता एक मुलगा रोहनचं अपहरण होतं. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होते. त्यानंतर एका पूल दुर्घटनेत ज्यानं स्वत:च्या मुलाला गमावलं त्यातून दुखी बापाने हे अपहरण केल्याचं पुढे येते. राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मंत्र्याच्या मुलाचे अपहरण घडवून आणलेले असते. यात जेव्हा रोहनला समजलं अपहरणकर्त्या निर्मलनं हे का केले तेव्हा घरी जाण्यापूर्वी रोहन अपहरणकर्त्याला मिठी मारतो ही सिनेमाची कथा, मात्र असाच काहीसा प्रकार खऱ्या आयुष्यात घडला आहे.
राजस्थानच्या जयपूर येथे एका पोलीस ठाण्यात अपहरण झालेला मुलगा अखेरचं आरोपीला भेटतो तेव्हा भावूक दृश्य पाहायला मिळालं. अपहरणकर्त्याच्या मिठीत पडून मुलगा धाय मोकलून रडला तेव्हा आरोपीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. ही भेट अवघ्या काही सेकंदाची होती मात्र त्यावेळी अनेकजण भावूक झाले. या मुलाला अपहरणकर्त्या आरोपीतून मिठीतून सोडवत पोलिसांनी त्याच्या आई वडिलाच्या सुपूर्द केले. त्यानंतर आई वडिलांनी मुलाची विचारपूस केली. ही सर्व घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली.
काय आहे कहाणी?
१४ जून २०२३ रोजी राजस्थानच्या जयपूर येथून ११ महिन्याच्या मुलाचं अपहण होते. अपहरण करणारा हा मुलाच्या आईच्या परिचयाचा होता. तो यूपीच्या अलीगड येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता. आरोपी तनुज चाहरने त्याच्या ४-५ साथीदारांसोबत मिळून पृथ्वीचं त्याच्या घरातून अपहरण केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर जयपूर पोलिसांनी सर्वात आधी अलीगडच्या हेड कॉन्स्टेबल तनुज चाहरचा शोध घेतला परंतु आरोपी त्याच्या ड्युटीवरही येत नव्हता. या घटनेनंतर यूपी पोलीस दलातून त्याला सस्पेन्ड करण्यात आले. तेव्हापासून आरोपी आणि अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस अनेक राज्यात धाड टाकत होती. परंतु आरोपीने कुठलाही सुगावा लागू दिला नाही. राजस्थान पोलिसांनी अपहरणकर्त्याची माहिती देणाऱ्या २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.
Kids and their innocence!!
— Vani Shukla (@oye_vani) August 30, 2024
Child refuses to leave his kidnapper. Seems to have developed a good bonding #jaipurKidnapping#japur
pic.twitter.com/EDgTE9ZAon
त्यानंतर एकेदिवशी जयपूर पोलिसांना माहिती मिळाली, आरोपी तनुज चाहरने त्याची दाढी वाढवून साधूचा वेश घेत मथुरा वृदांवनमार्गे यमुनेच्या खादर परिसरात झोपडी बनवली आहे. स्वत: साधू बनून मुलाला कृष्ण बनवून तो फिरत असतो. मग पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनीही साधूच्या वेशात भजन गात आरोपीच्या झोपडीत प्रवेश केला परंतु अपहरणकर्त्याला पोलिसांनी भनक लागली तो मुलाला घेऊन शेतातून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी २७ ऑगस्टला शेतात पाठलाग करून आरोपी तनुज चाहरला अटक केली आणि मुलाला ताब्यात घेतले.
दरम्यान, जयपूर पोलिसांनी अपहरणकर्त्यांकडून मुलाला आई वडिलांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला तेव्हा चिमुकला अपहरणकर्त्यासोबत जाण्याचा हट्ट करू लागला. त्यावर पोलीस कर्मचाऱ्याने मुलाला त्याच्याजवळ नेले तेव्हा चिमुकला अपहरणकर्त्याला मिठी मारून जोरजोरात रडू लागला. त्यानंतर आई वडिलांना सुपूर्द केल्यानंतरही तो शांत झाला नाही. मुलाला रडताना पाहून अपहरणकर्त्या आरोपीच्या डोळ्यातही पाणी आले. आरोपीने ११ महिन्याच्या बाळाचे अपहरण केले आणि १४ महिने त्याचा सांभाळ केला होता. आरोपी २ वर्षाच्या पृथ्वीला त्याचा मुलगा म्हणून सांगायचा. पोलीस तपासात पृथ्वी आणि त्याच्या आईला सोबत ठेवायचं म्हणून आरोपीने अपहरण केले होते असं समोर आले.
मुलाच्या आईला सोबत ठेवायचं होतं...
आरोपीने मुलाच्या आईवर खूप दबाव आणला होता परंतु ती ऐकण्यास तयार नव्हती. त्यामुळे आरोपीने चिमुकल्याचे अपहरण केले. अपहरणानंतर आरोपी तनुज चाहरने मुलाच्या आईला वारंवार फोन करून धमकी द्यायचा. बदल्याच्या आगीत आरोपीने त्याची नोकरी गमावली परंतु हट्ट सोडला नाही. पसार झालेला असताना त्याने मोबाईलचा वापर केला नाही. ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी वाढवली. सफेद दाढीला कलर केला असंही तपासात उघड झालं.