जन्मदात्या पित्यानेच केला मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 07:54 AM2021-03-27T07:54:00+5:302021-03-27T07:54:14+5:30
उलवे येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या आईचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले असून, इतर दोन मोठ्या बहिणी व वडिलांसोबत ती उलवे येथे रहात होती
नवी मुंबई : जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्या तेरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उलवे येथे घडली. याप्रकरणी पित्याला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीने घर सोडून पळ काढला होता. यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली असता तिला नेरूळच्या बालकाश्रमात ठेवण्यात आले होते.
उलवे येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या आईचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले असून, इतर दोन मोठ्या बहिणी व वडिलांसोबत ती उलवे येथे रहात होती. ट्रकवर चालकाचे काम करणाऱ्या वडिलाकडून तिला वासनेचे बळी पाडण्याचा प्रयत्न केला जात होता. यासाठी तिला मारझोड केली जायची. यामुळे २१ मार्चला तिने संधी साधून घरातून पळ काढला. यादरम्यान तिच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रारदेखील पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी शोध घेतला असता नेरूळ रेल्वेस्थानक परिसरात ती राहत असल्याचे समोर आले.
या घटनेदरम्यान तिच्या काही मैत्रिणी तिला घेऊन पोलीस ठाण्यात आल्या. यावेळी तिने घरी जाण्यास नकार दिल्याने नेरूळमधील बालकाश्रमात ठेवण्यात आले होते. समुपदेशनावेळी तिने वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली. त्यानुसार वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून बुधवारी अटक केली.