50 लाखांच्या खंडणीप्रकरणी छोटा राजनच्या राईट हँडला अटक; सख्ख्या पुतणीविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 09:09 AM2020-03-14T09:09:50+5:302020-03-14T09:11:27+5:30
सख्खी पुतणी प्रियदर्शनी निकाळजे विरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घ्यावी व दुसर्या पत्नीला घटस्फोट द्यावा, यासाठी खेडचे माजी उपसभापती यांना ५०लाख रुपयांची खंडणी छोट्या राजनची सख्खी पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २५ लाख रुपयांची खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या छोट्या राजनचा राईट हँड म्हणणार्यास खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
धीरज बाळासाहेब साबळे (रा. धानोरे, ता़ खेड), प्रियदर्शनी निकाळजे (रा. जांभुळकर नगर, वानवडी) आणि मंदार वाईकर (रा. निधीषा सोसायटी, मार्केटयार्ड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी कात्रज येथे राहणार्या खेडच्या माजी उपसभापतीने खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दिली आहे.
या उपसभापतीच्या दुसरी पत्नी व तिच्या बहिणीने त्यांच्याकडे मर्सिडीज कारची मागणी केली होती. त्यांनी शोरुममध्ये जाऊन गाडीची पाहणीही केली होती. परंतु, त्यांना पैशांची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीविरुद्ध भारती विद्यापीठात तक्रार केली होती. तसेच छोट्या राजनची सख्खी पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिच्याकडे तक्रार केली़.त्यावरुन ८ मार्च रोजी चेंबूरहून फिर्यादीला धमकीचा फोन आला. त्यांच्या तालुक्यातील धीरज साबळे याचा फोन आला. त्यानंतर दोघे जण वानवडीतील घरी जाऊन प्रियदर्शनी निकाळजे हिला भेटले. तिने भारती भारती विद्यापीठ पोलिसांकडील तक्रार मागे घ्यावी व दुसर्या पत्नीला घटस्फोट द्यावा, यासाठी ५०लाख रुपये दे. त्यातील २५ लाख रुपये मी घेणार व उरलेले तुमची पत्नी, मेव्हणी आणि मंदार वाईकर याला देणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर तिने पिस्तुल रोखून दुसर्या पत्नीला घटस्फोट दिला नाही तर पिस्तुलातील १० च्या १० गोळ्या घालून जीव मारेन, अशी धमकी दिली. मंदार हा छोटा राजन कंपनीचा राईट हँड आहे. आता तुझ्याकडे किती पैसे आहेत, अशी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी घाबरुन एक लाख रुपये आहेत, असे सांगितले व ते १ लाख रुपये साबळे याच्याकडे दिले. या प्रकारानंतर धीरज साबळे, मंदार वाईकर आणि प्रियदर्शनी निकाळजे यांनी वारंवार फोन करुन धमकी देत पैशांची मागणी केली. धीरज साबळे याने १३ मार्च रोजी २५ लाख रुपये घेऊन हॉटेल अरोरा टॉवर येथे बोलावले. तेव्हा त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला. धीरज साबळे हा २५ लाख रुपये घेण्यासाठी आला असताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.