२०० किलो चांदी, दीड किलो सोनं, १७ लाखांची कॅश; AI च्या मदतीने 'असा' झाला चोरांचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 01:55 PM2024-12-11T13:55:04+5:302024-12-11T13:55:40+5:30
१० दिवसांपूर्वी एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या २ कोटी ७० लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांना आता मोठं यश मिळालं आहे.
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात १० दिवसांपूर्वी एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या २ कोटी ७० लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांना आता मोठं यश मिळालं आहे. या गुन्ह्यातील तीन चोरट्यांना पोलिसांनी कारसह अटक केली आहे. सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने या चोरट्यांना पकडलं आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या आरबी अँड सन्सच्या दागिन्यांच्या दुकानातून चोरट्यांनी १७ लाख रुपये, दीड किलो सोनं आणि २ क्विंटल चांदीची भांडी लंपास केली आहेत. या चोरीचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. तपासानंतर ही चोरी यूपीच्या बॅटरी गँगने केल्याचं निष्पन्न झालं आहे.
पोलिसांनी मास्क घातलेल्या लोकांना पकडण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि एआयने फोटो मिळवून या गँगला पकडलं. आरोपी भागीरथ, यादराम हे उत्तर प्रदेशचे आहेत, तर अजय सिंह झोटवाडा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
चुरूचे एसपी जय यादव म्हणाले की, याच गँगने बंगालमध्येही ४ किलो सोनं चोरलं होतं. मास्कमागे असलेल्या चेहरे समोर यावेत म्हणून पोलिसांनी एआयची मदत घेतली. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. गँगच्या लोकांनी ३० नोव्हेंबरच्या रात्री ज्वेलर्स छगनलाल सोनी यांच्या दुकानातून दीड किलो सोनं, २०० किलो चांदी आणि १७ लाख रुपयांची रोकड चोरली होती.
छगनलाल यांनी १ डिसेंबर रोजी रतनगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात गुंतलेल्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांनी रतनगड, राजलदेसर, परसनेऊ, बिडासर, जसवंतगड बायपास आणि लाडनून येथील सुमारे १००० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर फुटेजमध्ये एक संशयास्पद वाहन दिसलं. या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी इतर राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती.
पोलीस अधिकारी दिलीप सिंह यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचे लोकेशन ट्रॅक केलं. यानंतर कार कुचमन शहरात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी यूपीचे रहिवासी भागीरथ बावरी, अजयसिंग बावरी आणि यादराम बावरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तीन आरोपींना अटक करण्यासोबतच पोलिसांनी वाहनही जप्त केलं आहे.