परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 09:31 PM2021-05-18T21:31:31+5:302021-05-18T21:32:51+5:30
CID summons Bhimrao Ghadge for enquiry : परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते.
राज्याच्या होमगार्ड विभागाचे प्रमुख परमबीर सिंग यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने केलेला भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्याकडून तक्रारदार पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. एसीपी भीमराव घाडगे हे अकोला येथील मुख्य पोलीस नियंत्रण कक्ष या ठिकाणी कार्यरत आहेत. घाडगे यांनी २० एप्रिल २०२१ रोजी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृहमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला होता.
भीमराव घाडगे यांनी अर्जात होमगार्डचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत सविस्तर माहिती घाडगे यांनी आपल्या तक्रार अर्जात मांडली होती. या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या संदर्भात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना समन्स पाठवून चौकशीसाठी १९ मे रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई येथे हजर राहण्यास सांगितले आहे.
परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. त्याच्याकडे तपासासाठी असलेल्या गुन्हे क समरी करण्यात यावे म्हणून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी घाडगे यांच्यावर दबाव आणला होता, तसेच घाडगे यांना खोट्या गुन्हयात अडकवण्यात आले होते, असा आरोप घाडगे यांनी केला अर्जात केला आहे.
घाडगे दांपत्याचे अंडा सेलमध्ये सव्वा वर्ष
परमबीर सिंग यांच्या जवळच्या सहा व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहती गुन्हे दाखल केल्यामुळे घाडगे यांच्यावर तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. एवढेच नाही तर घाडगे यांना त्यांच्या पत्नीसह एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखे किंवा आतंकवादी असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारगृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसताना घाडगे आणि त्यांच्या पत्नीने एक वर्ष दोन महिने अंडासेलमध्ये घालविले.
२७ पोलीस अधिकारी जाळ्यात...
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.