नागपुरात सिनेस्टाईल हत्येचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 08:33 PM2020-07-10T20:33:48+5:302020-07-10T20:35:39+5:30
कुख्यात गुन्हेगारांच्या एका टोळीने कटकारस्थान रचून प्रतिस्पर्ध्याची सिनेस्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी तरुणाच्या मित्रांनी प्रसंगावधान राखल्यामुळे भीषण हत्येचा गुन्हा टळला. २४ तासानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे काही वेळासाठी पोलीसही हादरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुन्हेगारांच्या एका टोळीने कटकारस्थान रचून प्रतिस्पर्ध्याची सिनेस्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी तरुणाच्या मित्रांनी प्रसंगावधान राखल्यामुळे भीषण हत्येचा गुन्हा टळला. २४ तासानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे काही वेळासाठी पोलीसही हादरले.
निखिल ऊर्फ गोलू लालसिंग मलिये (वय ३०) असे गुन्हेगारांच्या तावडीतून वाचलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची नावे गणेश सुधाकर मेश्राम (रा. जयताळा), मनोज वैद्य, अजिंक्य दिनकर नवरे (रा. एकात्मता नगर) आणि भुºया ऊर्फ दिलीप भालचंद्र गाते अशी असून पोलिसांनी त्यांना शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
गोलू मलिये हा भांगे विहारमध्ये राहतो. गेल्या वर्षी शेरा नामक कुख्यात गुंडाची हत्या झाली होती. त्यात गोलूला अटक करण्यात आली होती. तो कारागृहातून बाहेर आला. सध्या तो साई ट्रेडर्स नामक दुकान चालवतो. शेराची हत्या करणाºया आरोपींचा गेम करून आपली दहशत निर्माण करण्याचा कट कुख्यात गुंड गणेश मेश्राम याने रचला. त्यानुसार त्याने आपल्या सात ते आठ साथीदारांना सहभागी करून घेतले. कटानुसार त्याने गोलूकडे आरोपी अजिंक्य नवरे याला कार धुण्यासाठी काही दिवसांपूर्वी कामावर लावले. रोज सकाळी येऊन तो गोलूची कार धुवायचा. त्यामुळे त्याच्यावर गोलूचा विश्वास बसला होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास अजिंक्य गोलूकडे कार धुण्यासाठी आला. गोलू कारजवळ येताच अजिंक्यने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले. धोका लक्षात आल्यामुळे गोलू लगेच कारमध्ये बसला. तेवढ्यात आरोपी मेश्राम आणि त्याचे साथीदार गोलूच्या कारकडे धावले. त्यांच्या हातात घातक शस्त्रे होती. त्यांनी कारची काच फोडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गोलूने आरडाओरड केल्यामुळे त्याचे मित्र धावून आले आणि त्यांनी आरोपींवर दगडफेक केली. एका आरोपीच्या डोक्याला दगड लागल्यामुळे आरोपी घाबरले आणि तेथून त्यांनी पळ काढला.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. गोलू याने प्रतापनगर ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी वेगवेगळी पथके गुन्हेगारांच्या शोधासाठी कामी लावली. शुक्रवारी दुपारपासून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. गोलूकडे कार वॉशर म्हणून काम करणाºया आरोपी अजिंक्य नवरे याला ताब्यात घेताच त्याने या कटाचा सूत्रधार कुख्यात गुंड गणेश मेश्राम असल्याचे सांगितले. पोलिसांनी सायंकाळी मेश्रामलाही ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, मेश्रामने गोलू मलियेचा गेम करण्यासाठी महिन्याभरापूर्वीच कट रचला होता. या कटाचा एक भाग म्हणूनच त्याने अजिंक्य नवरे याला गोलूकडे कार वॉशिंगचे काम करण्यास सांगितले होते. नेहमीप्रमाणे सकाळी गोलू घराजवळ एकटाच असतो, हे आरोपींना माहीत होते. त्यामुळे त्याचा गेम करण्यासाठी अजिंक्यच्या सोबत मेश्राम आणि त्याचे सात ते आठ गुंड साथीदार आले. मात्र गोलूच्या मित्रांनी धोका ओळखून त्यांच्यावर दगडफेक केल्यामुळे भीषण हत्येची घटना टळली.
बदला चुकविण्यासाठी कट
कुख्यात मेश्राम आणि मनोज वैद्य या दोघांवर हत्या आणि इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोलू मलियेची हत्या करून शेराच्या हत्येचा बदला चुकवायचा आणि परिसरात दहशत निर्माण करायची, असा आरोपींचा उद्देश होता. वृत्त लिहिस्तोवर त्यांच्या अटकेची प्रक्रिया प्रतापनगर ठाण्यात सुरू होती. पोलीस त्याच्या फरार साथीदारांचाही शोध घेत आहेत.