सिनेस्टाईल थरार.. पोलीस शिपायाने चाळीच्या गल्ल्या पिंजून 'धरिला मोबाईल चोर'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 09:15 AM2021-01-25T09:15:02+5:302021-01-25T09:15:51+5:30
येथील पोद्दार हॉस्पिटलच्या मागच्या अभ्यास गल्लीत गुरविंदर सिंग नामक एका 61 वर्षीय वृद्ध वाहनचालकाच्या हातावर प्रहार करून एक तरुण मोबाईल हिसकावून पळाल्याची घटना घडली.
मुबई - मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून पोलीस तक्रारीनंतरही मोबाईल सापडेल याची खात्री नसते. मात्र, चोरलेला मोबाईल परत मिळविण्यापेक्षा त्यातील डेटा किंवा इतर बाबींचा गैरवापर न व्हावा म्हणून नागरीक मोबाईल हरवल्याची तक्रार करतात. मात्र, वरळीतील एका पोलीस हवालदाराने चोराचा सिनेस्टाईल पाठलाग करुन मोबाईल चोराला बेड्या ठोकल्या. रामचंद्र महाडिक असे या धाडसी पोलीस शिपायाच्या नाव असून त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. महाडिक यांनी 61 वर्षीय वृद्ध आजोबांचा चोरट्याने डल्ला मारलेला मोबाईल परत मिळवून दिला.
येथील पोद्दार हॉस्पिटलच्या मागच्या अभ्यास गल्लीत गुरविंदर सिंग नामक एका 61 वर्षीय वृद्ध वाहनचालकाच्या हातावर प्रहार करून एक तरुण मोबाईल हिसकावून पळाल्याची घटना घडली. घटनास्थळी लोकांची गर्दी जमल्याचे पाहून गस्तीवर असलेले बीटमार्शल हवालदार रामचंद्र धनाजी महाडीक ह्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात घेऊन, काळा टी-शर्ट, काळी टोपी घातलेला, दूरदर्शन केन्द्राच्या दिशेला पळून गेलेल्या मोबाईल चोराच्या मागावर हवालदार महाडिक निघाले. विशेष म्हणजे, तत्सम वेशभूषा असलेल्या तरूणांना हेरत त्यांनी संपूर्ण बी.डी.डी चाळींच्या गल्ल्या पिंजून काढल्या.
तेथील इमारत क्रं. 29 येथे त्यांना काळी टोपी-काळा टी-शर्ट घातलेला तरूण आरामात चालत असल्याचे आढळले. त्याच्या जवळ जाऊन चौकशीसाठी मार्शल दुचाकी स्टॅण्डवर लावत असताना त्या तरूणाने एका अरूंद गल्लीत जीवाच्या आकांताने धूम ठोकली. त्या गल्लीतून मार्शल दुचाकी जाणार नाही, हे लक्षात आल्याने हवालदार रामचंद्र महाडीकांनी धावत त्याचा माग घ्यायला सुरूवात केली. चोर स्थानिक असल्याने त्याला सर्व वाटा माहीत होत्या, पण हवालदार महाडीकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. चोर-पोलीस असा सिनेस्टाईल थरार रंगला असताना, स्थानिक नागरिकांनाही चोराचा पाठलाग करायला सुरुवात केली. अखेर, महाडिक यांनी महिंद्रा हाऊसजवळ त्या चोराच्या मुसक्या आवळळ्या. त्यानंतर, पोलीस ठाण्यातील सहकारी मित्रांना बोलावून घेतले.
वृद्ध तक्रारदार गुरविंदर सिंग यांनी आपला मोबाईल आणि चोरालाही ओळखले. त्यानंतर, चोरट्यानेही गुन्ह्याची कुबली दिली असून पोलिसांनी कलम 392अंतर्गत वरळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. राजेश रमेश दाजिंगे, वय वर्षे 20, या सासमिरा महाविद्यालयात कॉमर्स शाखा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. केवळ सुख-चैनीसाठी ही चोरी केल्याचे राजेशने सांगितले.