Salman Khan: सलमानला रोखणाऱ्या जवानावर कारवाई नाही, उलट सत्कार केला; CISFकडून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:18 PM2021-08-25T12:18:38+5:302021-08-25T12:19:38+5:30
Salman khan on Airport by CISF Jawan: सीआयएसएफने या जवानाचा फोन जप्त केला होता. तो कोणाशी बोलू नये म्हणून ही कारवाई केल्याचे सांगितले जात होते. मात्र, सीआयएएफने या वृत्ताचे खंडन केले आहे.
आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी रशियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या बॉलिवुडच्या दबंग सलमान खानला (Salman Khan) विमानतळावर तपासणीसाठी एका जवानाने रोखले होते. त्याचे हे धाडस पाहून नेटकरी वाहवा करत होते. परंतू त्याने प्रसार माध्यमांशी संवाद साधल्याने त्य़ाच्यावर कारवाई केल्याची बातमी आली होती. यावर सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स (CISF) ने खुलासा केला आहे. (CISF told we rewarded Somnath Mohanti, who stopped Salman khan.)
सीआयएसएफने या जवानाचा फोन जप्त केला होता. तो कोणाशी बोलू नये म्हणून ही कारवाई केल्याचे सांगितले जात होते. मात्र, सीआयएएफने या वृत्ताचे खंडन केले आहे. CISF ने अधिकृत ट्विटर हँडलवरून खुलासा केला. ''ही माहिती चुकीची आणि निराधार आहे. संबंधीत अधिकाऱ्याला त्याने त्याचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्यामुळे सन्मानित करण्यात आले आहे.''
The contents of this tweet are incorrect & without factual basis. In fact, the officer concerned has been suitably rewarded for exemplary professionalism in the discharge of his duty. @PIBHomeAffairs
— CISF (@CISFHQrs) August 24, 2021
सलमान खान 20 ऑगस्टला टायगर 3 च्या शुटिंगसाठी रशियाला निघाला होता. अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आगामी टायगर ३ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रशियाला रवाना होत होते. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सलमान मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारावर दाखल होताच चाहत्यांनी त्याला घेरले. या गर्दीतून वाट काढत तो आत प्रवेश करणार इतक्यात तेथे तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने त्याला रोखले. या जवानाचे नाव सोमनाथ मोहंती (Somnath Mohanti) आहे.
सुरक्षा तपासणी पूर्ण केल्याशिवाय आपण आत जाऊ शकत नाही, असे त्याने सलमानला ठणकावून सांगितले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच अवाक् झाले. सलमाननेही आढेवेढे न घेता त्याच्या सूचनांचे पालन केले. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर सर्वदूर होताच नेटकऱ्यांनी त्या सीआयएसएफ जवानाच्या धाडसाचे कौतुक केले. यानंतर सोमनाथशी ओडिशाच्या एका वृत्तवाहिनीने संपर्क साधला होता. यावरून कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आले होते.